मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार आता माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधील आणखी एका निर्णयाची चौकशी करणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार एकनाथ शिंदे सरकारच्या काळातील आरोग्य विभागाच्या निर्णयाची चौकशी करणार आहे. लवकरच येत्या काही दिवसांमध्ये मुख्यमंर्त्यांकडून आरोग्य विभागाने घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेणार असल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयामुळे एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधील तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे संशयाच्या फेऱ्यात आहेत. त्यामुळे तानाजी सावंत यांची देखील चौकशी केली जाऊ शकते असा अंदाज आहे. शिंदे सरकारच्या काळात आरोग्य विभागाने घेतलेल्या सर्व निर्णयाची चौकशी केली जाणार आहे. यामध्ये कोणत्या कामासाठी किती निधी घेतला याबाबत चौकशी होणार आहे.
शासकीय रुग्णालयांमध्ये आऊट सोर्सिंगच्या माध्यमातून यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता करण्याचं कंत्राट राज्य शासनाने रद्द केलय. या खर्चासाठी शासनाकडे निधी उपलब्ध नसल्याचं कारण देण्यात आलं असलं तरी ही निविदा प्रक्रिया नियमबाह्य पद्धतीने राबवण्यात आली असल्याचा आरोप विरोधकांकडून होतोय. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी हा गैरव्यवहार केल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे नेते विजय कुंभार तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय.
या वादग्रस्त निविदेमुळे स्वच्छतेच्या कामावर वर्षाकाठी होणारा 77 कोटींचा खर्च सुमारे 600 कोटींवर जाणार होता. महत्त्वाचं म्हणजे मंत्रिमंडळात प्रस्ताव मंजूर नसताना त्याचप्रमाणे अर्थ विभागाची मान्यता नसताना ही निविदा प्रक्रिया रेटण्यात आल्याचं या दोघांनी म्हटलंय. या निविदेमुळे संबंधित ठेकेदाराला सुमारे 6000 कोटींचा फायदा होणार होता. हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर राज्य शासनाने अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निविदेद्वारे देण्यात आलेले कंत्राट रद्द केले आहे.
