कोल्हापूर/महान कार्य वृत्तसेवा
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर पडक्या शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर सराईत गुन्हेगार दत्ता गाडेनं जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याची घटना ताजी असताना जाता कोल्हापूरमध्ये सुद्धा असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. इतकेच नव्हे, तर नराधम आरोपीने शरीरसंबंधांचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार बलात्कार केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. नराधम आरोपी कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतीतील असून त्याचं नाव विश्वजीत सचिन जाधव असं आहे. त्याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान पीडित तरुणीने 2018 पासून वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे. दोनवेळा इच्छेविरुध्द गर्भपात करायला लावल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे पुण्यातील घटना ताजी असताना आता अशाच प्रकारची घटना कोल्हापूरमध्ये सुद्धा घडली आहे.
सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
मोठी गोष्ट म्हणजे दत्तात्रेय रामदास गाडे हा पोलिसांसाठी नवीन चेहरा नसून त्याच्यावर यापूर्वी 6 गुन्हे दाखल आहेत. न्यायालयात अनेक प्रकरणे प्रलंबित असून त्यामुळेच तो जामिनावर फिरत होता. आरोपीने स्वारगेटला आपले घर बनवले होते, असे सांगितले जात आहे. स्वारगेट बस डेपो हे एक स्थानक आहे जिथे अनेक लोक ये-जा करतात. तिथे नेहमीच वर्दळ असते. बलात्काराचा आरोपी दत्तात्रय रामदास गाडे याने 2019 मध्ये कर्ज घेऊन कार खरेदी केली होती. त्या वाहनातून तो प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत असे. यावेळी त्याने एका वृद्धाला लुटले होते. त्याने वृद्धाला निर्जनस्थळी नेले आणि चाकूचा धाक दाखवून लुटले. याप्रकरणी त्याच्यावर यापूर्वीच गुन्हा दाखल आहे.
