Spread the love

शिरोळ : महेश पवार /महान कार्य वृत्तसेवा  
शिरोळ शहरात वाढत्या वाहतुकीच्या समस्येमुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी अपघातात, दत्तनगर येथील गंगा पिंटू व्हनमोरे (रा.दत्तनगर,शिरोळ, वय 13 वर्षे) हिला जीव गमवावा लागला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण शिरोळ शहरात हळहळ व्यक्त होत असून, शहरवासीयांमध्ये तीव्र संताप आहे.  या अपघातानंतर नागरिक आणि सामाजिक संघटनांनी शिरोळ शहरासाठी तातडीने रिंग रोड तयार करण्याची मागणी केली आहे. ऊस वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर-ट्रॉलींची वर्दळ असते. शिवाय श्री क्षेत्र नृसिंहवाडी आणि खिद्रापुर येथे जाण्यासाठी भक्तगण आणि पर्यंटकांची रिघ लागलेली असते.  त्यामुळे अरुंद रस्त्यांवर अपघाताच्या घटना घडत आहेत. सध्या मुख्य रस्त्यावरून मोठ्या वाहनांची वाहतुक होत असल्याने दुचाकी आणि लहान वाहनधारकांसाठी हे अत्यंत धोकादायक ठरत आहे.  

रिंग रोडची मागणी का?  

  • वाहतुक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी : ऊस वाहतुक करणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध झाल्यास आणि श्री क्षेत्र नृसिंहवाडी, खिद्रापुर, कर्नाटकात जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध झाल्यास, मुख्य रस्त्यावरून लहान वाहने आणि पादचाऱ्यांना सुरक्षित वाट मिळेल.  
  • शहरातील रहदारी नियंत्रित करण्यासाठी : वाहतुक सुरळीत राहिल्यामुळे शिरोळ शहरातील कोंडी कमी होईल.  
  • नवीन रस्ते आणि विकासाला चालना देण्यासाठी शहराच्या विकासासाठी योग्य नियोजन आवश्यक आहे. रिंग रोडमुळे व्यापारी आणि नागरिकांना लाभ होईल.  

प्रियजनांचे जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का?
शहरवासीयांनी याआधी अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रिंग रोडसाठी मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. आता या दुर्दैवी अपघातानंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “आमच्या प्रियजनांचे जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.  शिरोळसाठी तातडीने रिंग रोडच्या मंजुरीसाठी पावले उचलली नाहीत, तर नागरिक तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा स्थानिक नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि शिरोळसाठी लवकरात लवकर रिंग रोडच्या कामाला सुरुवात करावी, अशी मागणी होत आहे.