क्रीडा प्रेमी, खेळाडूंतून संताप; परतालुक्यातील नेत्याचा खटाटोप
संतोष पाटील/महान कार्य वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी खा. लोकनेते जयवंतराव आवळे यांनी मोठा संघर्ष करून हातकणंगलेतील खेळाडूंसाठी ताकद वापरून क्रीडा संकुल मंजूर करून आणलं. परंतू, या नंतर गेल्या २० वर्षात या संदर्भात काहीच हालचाली झाल्या नाहीत. परंतू, आता सत्ता बदलानंतर त्यांच्याच नावाने ठराव झालेले क्रीडा संकुल पेठवडगाव येथे हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी परतालुक्यातील आ. डॉ. दलितमित्र अशोकराव माने यांनी पुढाकार घेतल्याचे समजते.
आमदारांच्या या भूमिकेमुळे हातकणंगलेतील क्रीडाप्रेमींतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच शिरोळमधून येवून हातकणंगलेत त्यांनी राजकारण करू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री फडणवीस आणि जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहून आम्ही अशोकराव माने यांच्या नारळीच्या बागेला मताच्या रूपाने पाणी दिले ही आमची चूक झाली का? असा उद्विग्न सवाल हातकणंगलेकर उपस्थित करत आहेत. तर हातकणंगलेकरांनी पाणी दिले नाही म्हणून नारळीची बाग वाळली असे भविष्यात होवू नये हीच अपेक्षा आहे. लोकनेते जयंतराव आवळे आणि माजी आ.प्रकाश आवाडे यांचा हातकणंगलेच्या क्रीडा संकुलावरून मोठा संघर्ष झाला. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी या वादावर तोडगा काढत हुपरी आणि हातकणंगले अशी दोन क्रीडा संकुलांना मंजूरी देवून पडदा टाकला होता. त्यानंतर डॉ. सुजित मिणचेकर यांनी हे क्रीडा संकुल मिणचेमध्ये करण्याचा प्रयत्न केला. परंतू, यासही विरोध झाला. त्यामुळे हा विषय मागे पडला. त्यामुळे संतापलेल्या हातकणंगलेतील क्रीडाप्रेमींनी सामाजिक कार्यकर्ते सागर पुजारी यांच्या नेतृत्वाखाली तहसिल कार्यालय आवारात उपोषण सुरू केले. यावेळी लोकनेते जयवंतराव आवळे यांनी हे क्रीडा संकुल हातकणंगलेतच होईल, अशी लेखी ग्वाही दिली होती. परंतू, विधानसभा निवडणुकीनंतर राजूबाबा आवळे यांचा पराभव झाला आणि परतालुक्यातील डॉ. अशोकराव माने हातकणंगलेतून विजयी झाले. आता त्यांनी क्रीडासंकुलाबाबतची कोणतीही पार्श्वभूमी न पाहता हे क्रीडा संकुल पेठवडगाव येथे नेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणावर पुन्हा एकदा ठिणगी पडण्याची शक्यता आहे.