टाकवडे (ता. शिरोळ) – ऊसतोडणीसाठी आलेल्या लक्ष्मीबाई अनिल चव्हाण (वय 37, मूळ रा. धरणगाव, जि. जळगाव) यांचा विहिरीत पाय घसरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना आज सकाळी घडली.
प्राप्त माहितीनुसार, लक्ष्मीबाई चव्हाण या टाकवडे गावातील एका शेतातील विहिरीत पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, अचानक तोल जाऊन त्या विहिरीत पडल्या. या दुर्घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली. मृत महिलेच्या लहान मुलींनी आईचा मृतदेह पाहून हंबरडा फोडला, तर नातेवाईकांनी आक्रोश केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. या घटनेमुळे ऊसतोड कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
