मुंबई /महान कार्य वृत्तसेवा
महाराष्ट्र सरकारने राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर दिली आहे. सरकारने कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 3 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे यासंदर्भातला शासन निर्णयही निघाला असून यामध्ये कर्मचाऱ्यांना कोणत्या महिन्यापासून वाढीव डीए मिळणार, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
सरकारने काय निर्णय घेतला?
राज्य सरकारच्या वित्त विभागाने 25 फेब्रुवारी 2025 रोजी एक शासन निर्णय जारी केला आहे. या शासन निर्णयानुसार राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात 1 जुलै 2024 पासून सुधारण करण्यात आली आहे. या सुधारणेनुसार महागाई भत्त्याचा दर 50 टक्क्यांवरून 53 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. म्हणजेच आधीच्या डीए दरामध्ये तीन टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. विशे, म्हणजे हा वाढीव डीए 1 जुलै 2024 पासून लागू होणार आहे.
फेब्रुवारी महिन्यात मिळणार थकबाकी डीए :
या शासन निर्णयानुसार वाढीव डीए 1 जुलै 2024 पासून लागू होईल. हा वाढीव डीए फेब्रुवारी महिन्याच्या वेतनात दिला जाईल. म्हणजेच 1 जुलै 2024 ते 31 जानेवारी 2025 या सात महिन्यांचा वाढीव डीए फेब्रुवारी 2025 महिन्याच्या वेतनात थकबाकी म्हणून दिला जाईल.
