Spread the love

दिल्ली/महान कार्य वृत्तसेवा
देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता उद्या (24 फेब्रुवारी) शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांना उद्या 22 हजार कोटी रुपयांचा निधी वितरीत करणार आहे. किसान सन्मान निधीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवली जाणार आहे. पण हा निधी तुमच्या खात्यात जमा झाला की नाही? हे तुम्हा कसे तपासू शकता? जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 18 वा हप्ता ऑक्टोबर 2024 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता. आता या योजनेचा 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी रोजी जारी केला जाणार आहे. पीएम किसान योजनेंतर्गत, शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये दिले जातात, जे प्रत्येकी 2,000 रुपयांच्या हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केले जातात. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने 2019 मध्ये सुरू केली होती. तेव्हापासून पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत आहे. दरम्यान, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता हा उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता मिळाला की नाही हे कसे तपासाल?
अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
आता, उजव्या बाजूला ‌’नो युवर स्टेटस‌’ टॅबवर क्लिक करा.
तुमचा नोंदणी क्रमांक एंटर करा आणि कॅप्चा कोड भरा आणि ‌’डेटा मिळवा‌’ हा पर्याय निवडा.
यानंतर तुम्हाला तुमच्या टॅबच्या स्क्रीनवर संपूर्ण स्टेटस दिसेल.
9.8 कोटी शेतकऱ्यांना मिळणार लाभ
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भागलपूर, बिहार येथून पीएम किसानचा 19 वा हप्ता जारी करणार आहेत. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. पंतप्रधान 24 फेब्रुवारीला भागलपूर, बिहारमध्ये पीएम-किसानचा 19 वा हप्ता जारी करतील. एकूण 22,000 कोटी रुपये थेट 9.8 कोटी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवले जातील.