Spread the love

अजित लटके/महान कार्य वृत्तसेवा

      शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कबनूर सह आसपासच्या परिसरातील गुन्हेगारीला अक्षरशः ऊत आला आहे.नुकताच झालेला तलवार हल्ला,तर किरकोळ कारणातून शाळेच्या स्नेहसंमेलना दरम्यान झालेला युवकाचा खून ही त्याचीच साक्ष असून शिवाजी नगर पोलिसांचा धाक संपला आहे का?असा प्रश्न उपस्थित होत आहे. “खब्बन ऊर” ही ओळख असलेल्या गावची ओळख गुन्हेगारी कडे वळत आहे.त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

जुजबी कारवाया 

शिवाजी नगर हद्दीत गावठी दारू,मटका,गुटखा,गांजा विक्री राजरोस सुरू आहे.मात्र वरून आदेश आल्या नंतर ठरल्या प्रमाणे ठराविक लोकांवर कारवाया केल्या जातात.त्यामुळे अवैध व्यावसायिक डी.बी.च्या पोलिसांना देवाची उपमा देतात.त्यामुळे कारवाईचा फार्स होत असल्याने अवैध व्यवसायाला अच्छे दिन आले आहेत.त्याचाच परिणाम म्हणून गुन्हेगारी कारवाया वाढल्या आहेत.पोलीस आपलं काय वाकडं करू शकत नाहीत असा कॉन्फिडन्स आल्याने खून,मारामाऱ्या यामध्ये वाढ झाली आहे.

डी.बी.पथक बदलण्याची गरज?

गुन्हे शोध पथक हा पोलीस ठाण्याचा कणा असतो.शिवाजी नगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या डीबी पथकात बहुतांश कर्मचारी स्थानिक असल्याने अवैध धंद्यांची  खडानखडा माहिती आहे. मात्र ते बघ्याची भूमिका घेत असल्याने व दोन नंबर वाल्यांसोबत लांगेबांधे असल्याने कारवाईवर मर्यादा पडत असल्याची चर्चा आहे.त्यामुळे इतर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याबाबतीत वेगळा न्याय तर शिवाजी नगरला वेगळा न्याय असा भेदभाव पोलीस अधीक्षक का करत आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे.