Spread the love

नागपूर/ महान कार्य वृत्तसेवा
राष्ट्रवादी काँग्रेसचे वादग्रस्त मंत्री धनंजय मुंडे व त्यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडणारे भाजपचे आमदार सुरेश धस या बीड जिल्ह्यातील दोन नेत्यांमध्ये मनोमीलन घडवून आणण्याचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेला प्रयत्न त्यांच्यासाठी राजकीय अडचणी वाढवणारा ठरण्याची शक्यता आहे , विरोधी पक्षाने या मुद्यावर भाजपवर टीका केली आहे.
धस हे भाजपचे आमदार आहेत, व ते महायुतीच्या घटक पक्षातील मंर्त्यावर आरोप करीत असेल तर भाजपचा प्रदेशाध्यक्ष म्हणून वाद मिटवण्याचा प्रयत्न म्हणून मी धस आणि मुंडे यांच्यात मनोमीलन घडवून आणण्याचा प्रयत्न केला. यात काही गैर नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले असले तरी मुंडेंच्या भेटीची वाच्यता बावनकुळे यांनी का केली ? असा प्रश्न धस यांनी उपस्थित करून प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निघृण हत्त्येचा मुद्दा धस यांनी विधानसभेत आणि रस्त्यावर आंदोलन करून जनतेसमोर मांडला. तो मांडताना या प्रकरणातील आरोपींचे राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी असलेले संबंध सुद्धा त्यांनी जाहीरपणे सांगितले, यासोबत मुंडेचे अनेक कथित घोटाळ्यांकडेही त्यांनी लक्ष वेधले. सरपंच हत्ये प्रकरणात धस यांनी घेतलेला पुढाकार हा भाजपपासून दुरावलेल्या मराठा समाजाला जोडण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. नुकताच आष्टी मतदारसंघात एका कार्यक्रमात फडणवीस यांच्या उपस्थितीत धस यांनी ‘मेरे पास फडणवीस है’ असा दिवार स्टाईल डॉयलॉग उपस्थितांना ऐकवला. त्यामुळे धस यांच्या मोहिमेला फडणवीस यांचा पाठिंबा आहे, असे चित्र राजकीय वर्तुळात निर्माण झाले. फडणवीस -धस जवळीक वाढत असतानाच अचानक धस आणि मुंडे यांची भेट झाल्याची बातमी आली. खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीच हा गौप्यस्फोट केला. साडेचार तास त्यांच्या निवासस्थानी बैठक झाल्याचा दावा केला. मनभेद दूर करण्यास मी त्यांना सांगितले. यावेळी मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणाची चर्चा झाली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आणि तेथूनच या प्रकरणाच्या चर्चेला तोंड विविध अंगाने तोंड फुटले आणि चर्चेच्या केंद्रस्थानी ठरले ते बावनकुळे.