Spread the love

पुणे/महान कार्य वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात येणारी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी)ची लेखी परीक्षा शुक्रवार 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आलीय. या परीक्षेसाठी एकूण 16,11,610 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यामध्ये 8,64,120 मुले, 7,47,471 मुली आहेत आणि 19 तृतीयपंथी आहेत. एकूण 23492 माध्यमिक शाळांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून, या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी 5130 मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आलीय, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आज इयत्ता दहावीच्या परीक्षेसंदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी याबाबत माहिती दिली.
परीक्षेदरम्यान महत्त्वाच्या बहुतांश विषयांच्या पेपरमध्ये खंड : फेब्रुवारी-मार्च 2025 च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाइन स्वीकारण्यात आलेली असून, सरल डेटावरून माध्यमिक शाळांची माहिती घेऊन आवेदनपत्रे ऑनलाइन भरलेली आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी 20 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑनलाईन आवेदनपत्रे स्वीकारण्यात आलेली आहेत. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी-मार्च 2025 च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षेचे वेळापत्रक तयार करण्यात आले असून, परीक्षेदरम्यान महत्त्वाच्या बहुतांश विषयांच्या पेपरमध्ये खंड ठेवण्यात आलाय. मंडळामार्फत प्रसिद्ध आणि छपाई केलेले वेळापत्रकच ग्राह्य धरावे अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असंही सांगितलं जातंय.