Spread the love

भिवंडी/ महान कार्य वृत्तसेवा
भिवंडी शहरातील भादवड येथील एका इमारतीत राहणाऱ्या अडीच वर्षीय बेपत्ता झालेल्या मुलाचा मृतदेह घराशेजारीच काही अंतरावर असलेल्या शौचालयाच्या टाकीत आढळून आला आहे.आयांश अमरजीत जयस्वाल असे मृतक बालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक आयांश हा शुक्रवार 14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता घराबाहेर खेळत असताना बेपत्ता झाला होता. त्याचा परिसरात शोध घेऊन ही तो न सापडल्याने त्याच्या आईने दिलेल्या तक्रारी वरून शांतीनगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्याचा परिसरात स्थानिक कुटुंबीयांसह पोलिसांकडून शोध घेतला जात असताना तो कुठेही आढळून आला नव्हता.
चार दिवसांनी सापडला मृतदेह
मंगळवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास अयांश राहत असलेल्या इमारतीपासून काही अंतरावर असलेल्या शौचालयाच्या टाकीत त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी बालकाचा मृतदेह बाहेर काढून तो उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला आहे. तर अमरजीत जयस्वाल यांना चार मुलीनंतर आयांशचा जन्म झाला होता.
जयस्वाल कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
सध्या मृतदेह शव विच्छेदनासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत. अवघ्या अडीच वर्षाचा आयांश शौचालयाच्या टाकीत कसा पडला, यामागील सत्य शोधण्यासाठी पोलीस तपास करत आहेत. ही घटना अपघात आहे की, दुसऱ्या कोणत्यातरी कृत्याचा परिणाम, यावरही तपास सुरू आहे. या घटनेमुळे जयस्वाल कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून शोककळा पसरली आहे.