नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवा
देशाच्या राजधानीत 1 नोव्हेंबर 1984 मोठी शीख विरोधी दंगल उसळली होती. या दंगलीत जमावाने दोन जणांचा खून केल्याने मोठी खळबळ उडाली. शीख विरोधी दंगलीदरम्यान सरस्वती विहार प्रकरणात माजी काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना दोषी ठरवण्यात आलं. सज्जन कुमार यांच्या शिक्षेचा राऊस अव्हेन्यू न्यायालयात आज फैसला सुनावण्यात येणार आहे. विशेष न्यायाधीश कावेरी बवेजा शिक्षेच्या खटल्याची सुनावणी करणार आहेत. यापूर्वी न्यायालयानं 31 जानेवारीला निर्णय राखून ठेवला.
देशाच्या राजधानीत शीख विरोधी दंगल : देशाच्या राजधानीत 1 नोव्हेंबर 1984 या दिवशी राज नगर परिसरात शीख विरोधी दंगल उसळली. या दंगलीत सरदार जसवंत सिंग आणि सरदार तरुणदीप सिंग यांची हत्या करण्यात आली. ”जमावानं सायंकाळी 4-4.30 च्या सुमारास राज नगर परिसरातील पीडितांच्या घरावर लोखंडी रॉड आणि काठ्यांनी हल्ला केला. या जमावाचं नेतृत्व सज्जन कुमार करत होते. सज्जन कुमार हे त्यावेळी बाह्य दिल्ली लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार होते. तक्रारीनुसार, सज्जन कुमारनं जमावाला हल्ला करण्यास प्रवृत्त केलं. यानंतर जमावानं सरदार जसवंत सिंग आणि सरदार तरुणदीप सिंग यांची हत्या केली. जमावानं पीडितांच्या घरांची तोडफोड केली, लुटमार केली आणि आग लावली,” असा आरोप तक्रारदारानं केला. रंगनाथ मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी आयोगासमोर तक्रारदारानं दिलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे सरस्वती विहार पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला. एफआयआरमध्ये भारतीय दंड संहितेच्या अनेक कलमांखाली आरोप होते.
माजी काँग्रेस नेते सज्जन कुमारनं केलं आत्मसमर्पण : दिल्ली उच्च न्यायालयानं 17 डिसेंबर 2018 रोजी दिल्ली शीख दंगलीतील आणखी एका प्रकरणात बलवान खोखर आणि सज्जन कुमार याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. माजी नौदल अधिकारी भागमल यांच्याव्यतिरिक्त उच्च न्यायालयानं माजी काँग्रेस नगरसेवक बलवान खोखर, गिरधारी लाल आणि इतर दोघांना ट्रायल कोर्टानं दिलेली शिक्षा कायम ठेवली. सज्जन कुमारने 31 डिसेंबर 2018 रोजी करकरडूमा न्यायालयात आत्मसमर्पण केले.
