Spread the love

संतोष पाटील/महान कार्य वृत्तसेवा

हातकणंगले पोलीस ठाण्याकडील होमगार्ड अर्थात मिनी पोलिसांनी अक्षरश: नंगानाच सुरू केला आहे. खाकीचा आधार घेत व्यावसायिक, वाहनधारकांची दिवसा ढवळ्या लुटमार सुरू आहे. पोलिसांपेक्षा त्यांचाच रूबाब वाढल्याने लोक वैतागले आहेत. पोलीस निरीक्षक शरद मेमाने ही बाब गांभीर्याने घेणार का? असा संतापजनक सवाल उपस्थित होत आहे.

पोलिसांची अपुरी संख्या आणि हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढलेले अवैध धंदे, गुन्हेगारी यावर नियंत्रण रहावे यासाठी पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी हातकणंगले पोलीस ठाण्याकडे काही होमगार्ड नियुक्त केले आहेत. परंतू, ज्या कामासाठी हे होमगार्ड नियुक्त केले आहेत. त्यापेक्षा त्यांच्या उचापतीच अधिक वाढलेल्या आहेत असे अलीकडच्या काळात दिसून येत आहे. अंगातील असलेल्या खाकीच्या आधारावर त्यांनी चांगलीच दहशत निर्माण केली आहे. रस्त्यावर वाहने अडविणे, तपासणी करणे, हॉटेल, लॉजिंगमध्ये बसून दमदाटी करणे, रामलिंग, चिंद्यापीर परिसरात फेरफटका मारत नवदांपत्य, कॉलेज युवक-युवतींची वाहने अडवून तपासणी करणे आदी प्रकार राजरोसपणे सुरू आहेत. हा प्रकार वाढत असल्यामुळे यांच्यावर कोणाचे नियंत्रण आहे का? अशी विचारणा होत आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार ‘नाकापेक्षा मोती जड’ अशी स्थिती झालेली आहे. त्यामुळे यांना चाप लावण्याची गरज आहे. होमगार्डना हे अधिकार आहेत का? अशी विचारणादेखील यानिमित्ताने होत आहे.

पोलीस निरिक्षकांचा ‘सत्संग’

पोलीस निरीक्षक शरद मेमाने हातकणंगले पोलीस ठाण्याची सुत्रे घेतल्यापासून काही दिवस त्यांनी कारवाईचे नाटक केले. लोकांना वाटले की हे श्री श्री रविशंकर यांचे भक्त आहेत. त्यांचा सत्संग चांगला होईल, अशी अपेक्षा होती. परंतू, काही दिवसातच सर्व उद्योग, व्यवसाय सुरळीत सुरू झाले. कदाचित पोलिसांवर त्यांचा विश्वास नसावा म्हणूनच होमगार्ड यांना त्यांनी अधिकार बहाल केले आहेत का? अशी चर्चा जुन्या तहसिल कार्यालयाच्या आवारात आहे.