मुंबई/ महान कार्य वृत्तसेवा
ठाकरेंच्या शिवसेनेचे काही खासदार हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. यावर विविध राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या सर्व चर्चांवर आता खुद्द उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी थेट सरकारला चॅलेंजच दिलंय. तसंच ‘लाडकी बहीण यौजने’च्या अपात्र प्रकरणावरुन सरकारला खडेबोल सुनावलेत.
सगळेच तुमचे गुलाम नाहीत : ”गद्दार होते ते निघून गेले. ज्यांनी गद्दारी केली त्यांची मनं मेली आहेत. तलवार कोणावर चालवत आहोत हेच त्यांना कळेनासे झाले. मग अशा वेळेला तुमच्यासारख्या सगळ्या शिवसैनिकांचं कौतुक नाही करायचं तर मग कोणाचं करायचं? सुरज चव्हाण एक वर्ष तुरुंगात राहून आलाय. सगळेच काय तुमचे गुलाम नाही होऊ शकत आणि होणार नाही. गुलामी ही महाराष्ट्राच्या रक्तामध्ये नाही,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली.
एकतरी शिवसैनिक फोडून दाखवा : ”तुमची सर्व यंत्रणा म्हणजे सीबीआय, ईडी, इनकम टॅक्स हे बाजूला ठेवून मर्द असाल, हिंमत असेल तर एकतरी शिवसैनिक फोडून दाखवा, तुमचं डोकं फोडल्याशिवाय राहणार नाही,” असं आव्हान उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना दिलं. ठाकरेंचे खासदार फुटले जाणार अशी चर्चा होती, त्याला जोरदार प्रत्युत्तर ठाकरेंनी दिलं. अंबादास दानवे यांच्या आतापर्यंतच्या विधानपरिषद कार्यकाळातील ‘शिवबंधन’ या कार्य अहवालाचं उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन झालं.
