मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी (दि. 08) जाहीर होणार आहेत. दिल्लीत आप, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत झाली आहे. आज सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून सध्याच्या ट्रेंडनुसार भाजप 70 जागांपैकी 40 जागांवर आघाडीवर आहे. तर आप 30 जागांवर आघाडीवर असून काँग्रेस एकाही जागेवर आघाडीवर नाही. लोकसभा निवडणुकीत इंडीआ आघाडीत एकत्र लढलेल्या काँग्रेस आणि आपने विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढवल्या आहेत. याचा फायदा भाजपला होणार असल्याची शक्यता आहे. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलंय.
संजय राऊत म्हणाले की, काल दिल्लीत राहुल गांधी यांच्यासोबत पत्रकार परिषद झाली. त्यातच मी सांगितले की, दिल्लीत महाराष्ट्र पॅटर्न लागू केला. ज्या प्रमाणे राज्यात घृणास्पद कृत्य झाले तेच दिल्लीत दिसत आहे. राज्यात जो प्रौढांचा आकडा दिलाय त्यापेक्षा जास्त मतदान झाले आहे. असाच पॅटर्न दिल्लीत राबवला गेला.
प्रत्येक मतदारसंघात 15 ते 20 हजार मते वाढवली गेली, यातील काही मते जाणार कुठे तर त्यातून बिहारला वळवली आणि आता दिल्लीत वळवली. दिल्ली एक लहान राज्य आहे. नायब राज्यपाल यांच्याकडे अधिकार असतात. त्यांनी तिकडे केजरीवाल यांना कामच करून दिले नाही. मी दिल्लीत होतो, जागोजागी टेबल टाकून पैसे वाटले जात होते. तक्रार घेऊ नका, अशा स्पष्ट सूचना अमित शाह यांनी पोलिसांना दिल्या होत्या, असा आरोप त्यांनी यावेळी केला. तर काँग्रेस आणि आप एकत्र राहिले असते तर बरे झाले असते. काँग्रेस आणि आपचा शत्रू भाजप आहे. काँग्रेस आणि आप एकत्र लढले असते तर पहिल्या तासातच जिंकले असते, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
संजय राऊतांचा फडणवीसांना टोला
दिल्लीच्या निकालानंतर काँग्रेसचे नाव पुसलं जाईल. पराभवाच्या भीतीनेच राहुल गांधींकडून कव्हर फायरिंगचा प्रयत्न सुरु असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचा राष्ट्राचा अभ्यास कमी आहे. त्यांना राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची इच्छा असावी पण अमित शाह यांच्यामुळे ते शक्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर राहुल गांधी यांनी कशाप्रकारे मतदान वाढवले गेले हे सगळे सांगितले आहे. कदाचित फडणवीस यांचा भमनिरास झाला असेल कारण त्यांच्या बाजूला वेडे लोक बसले असतील. फडणवीस यांनी जरा अभ्यास करावा, असा टोला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
