Spread the love

करुणा मुंडेंनी मानले कोर्टाचे आभार

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना वांद्रे येथील कौटुंबीक न्यायालयाने घरगुती हिंसाचार प्रकरणात धनंजय मुंडे यांना दोषी ठरवले आहे. कोर्टाने धनंजय मुंडे यांना पत्नी करुणा मुंडेंना दोन लाखांची पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. या सगळ्या प्रकरणावर आता करुणा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी कोर्टाचे आभार मानले आहेत. शिवाय आपण 15 लाखांची मागणी केली होती, पण कोर्टाने दोन लाखांची पोटगी देण्याचे आदेश दिले. या निर्णयाविरोधात आपण हायकोर्टात जाणार असल्याचं करुणा मुंडे यांनी सांगितले आहे.
कोर्टाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना करुणा मुंडे म्हणाल्या, न्यायालयाचे खूप खूप आभार मानते. आज सत्याचा विजय झाला आहे. लोकांना वाटतं कोर्टात न्याय मिळत नाही. पण मला न्याय मिळाला आहे. याआधीही औरंगाबाद कोर्टात माझ्या बाजुने निकाल लागला होता. आजही माझ्या बाजुने निकाल लागला. यासाठी मी कोर्टाचे आभार मानते.”
शिवाय यावेळी करुणा मुंडे यांना अश्रू अनावर झाले. ढसाढसा रडत त्यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. मला जो त्रास झाला, तो शब्दात मांडता येऊ शकत नाही. बिना नवऱ्याचे जगणे अत्यंत अवघड आहे. नवरा खूप मोठ्या पदावर असताना, असे जीवन जगणे अवघड आहे. समोर मोठे मोठे वकील होते. पण माझ्या वकिलांचे मी आभार मानते, त्यांनी एक रुपयाही न घेता माझी केस लढवली. बीडचे वकील गणेश कोल्हे यांनी माझी केस लढवली. एक महिला म्हणून मोठ्या शक्तीसोबत लढणं खूप अवघड असतं. माझ्यासोबत एक केवळ वकील होता. माझ्या मागणीनुसार पैसे मिळाले नाहीत. 1996 पासून मी माझ्या नवऱ्यासोबत आहे. मी पुन्हा हायकोर्टात जाणार आहे. धनंजय मुंडे यांचे वकील मी धनंजय मुंडेंची बायको नाही, असा युक्तीवाद करत होते. पण माझ्या वकिलांनी सिद्ध करून दाखवले की मीच धनंजय मुंडे यांची बायको आहे आणि पहिली बायको आहे, असेही करुणा मुंडे म्हणाल्या.