सातारा/ महान कार्य वृत्तसेवा
सातारा जिल्ह्यातील राजकीय घडामोड घडण्याआधी मोठी एक बातमी समोर आली आहे. माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर इन्कमटॅक्स विभागाने छापा मारला आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर हे अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये घरवापसी करणार असल्याचे वृत्त होते.
आज सकाळीच आयकर विभागाचे एक पथक संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर दाखल झाले. सकाळी सहा वाजल्यापासूनच बंगल्यामध्ये आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संजीवराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नाईक निंबाळकरांच्या बंगल्यामध्ये आत कोणालाही प्रवेश दिला जात नाही.
संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याशिवाय रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावरही आयकर विभागाने छापा मारल्याचे वृत्त आहे. संजीवराजे आणि रघुनाथराजे हे दोघेही रामराजे निंबाळकर यांचे चुलत बंधू आहेत. रघुनाथराजे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. संजीव राजे नाईक निंबाळकर यांनी निवडणुकीआधी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. आता, संजीवराजे हे अजितदादांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचे वृत्त समोर आले होते.