Spread the love

मुंबई/ महान कार्य वृत्तसेवा
शिवराज राक्षेच्या कुटुंबियांनी जर आमच्याकडे पंचांच्या विरोधात तक्रार दिली तरी या संदर्भात समिती स्थापन करून पंचांवर देखील कारवाई केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी दिली आहे. पैलवानांचे नुकसान होऊ नये म्हणून गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत. शिवराज आणि महेंद्र या दोघांवर तीन वर्षासाठी कुस्तीत निलंबित करण्यात आलं आहे. चंद्रहार पाटील आमचा मित्र आहे, त्याला काय बोलायचे ते बोलू द्या. तो थोडा गरम डोक्याचा आहे, असंही त्यांनी पुढे म्हटले आहे.
काय म्हणाले कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे?
काल पंचाना लाथ मारल्यानंतर आमचे पंच तिथे मॅटवरती आंदोलनाला बसले होते. संपूर्ण पंचाची इच्छा होती. शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यावरती कारवाई करून गुन्हे दाखल व्हावेत. पंच मॅटवरून उठत नव्हते. त्या ठिकाणी रामदास तडस आले, त्यांनी सर्व पंचांशी आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. शिवराज आता आठ दिवसांमध्ये कामाला लागणार आहे आणि महेंद्र गायकवाडची देखील रेल्वेची ट्राईल झालेली आहे. वाद विवाद होतचं असतात. पंरतु त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले असते. त्यांच्या पुढच्या आयुष्यात त्यांना नोकरी मिळाली नसती. काही अडचणी ल्आया असत्या. निकाल लागायला वेळ गेला असता. त्यासाठी आम्ही त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला नाही. आम्ही सर्वजण कुस्ती संघाचे पदाधिकारी, कुस्ती संघाचे अध्यक्ष यांनी सर्वांनी चर्चा करून या दोन्ही पैलवानांवरती तीन-तीन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
पंचांचा निर्णय चुकीचा होता का?
यावर बोलताना ते म्हणाले, मी शिवराजची त्याच्या आईची, कुटूंबातील सर्वांची प्रतिक्रिया मी ऐकली. त्यांनी असं म्हटलं की, पंचांवर देखील कारवाई केली पाहिजे. त्यांना जर पंचाविरोधात आक्षेप असेल तर त्यांनी कुस्तीगीर संघाकडे अर्ज करावा. कुस्तीगीर संघाकडे अर्ज केल्यानंतर त्या व्हिडिओमध्ये साईड पंच असेल किंवा मुख्य पंच असेल तर त्या सर्व गोष्टींची शहानिशा करावी लागेल. त्यानंतर एक कमिटी नेमली जाईल. त्यामध्ये जर पंच दोषी आढळले तर, तर शंभर टक्के पंचावर देखील कारवाई केली जाईल, असंही संदीप भोंडवे यांनी स्पष्ट केलं आहे.
गोळ्या घालण्याच्या वक्तव्यावर काय म्हणाले भोंडवे?
गोळ्या घालण्याच्या चंद्रहार यांच्या वक्तव्यावर बोलताना भोंडवे म्हणाले, पैलवान गरम डोक्याचे असतात. चंद्रहार यांनी उद्वीग्नपणे गोळ्या घाला म्हटलं पण, जे बोलणारे आहेत ते आमचेच आहेत. आज जरी ते आमच्यासोबत रागाने बोलत असले तरी ते उद्या आमच्यासोबत गोड बोलणार आहेत, त्यामुळं मी त्यावर काही बोलणार नाही. कुस्तीगिर संघ नियमाने बाधलेला आहे. जागतिक कुस्तीचे जे नियम आहेत, ते महाराष्ट्रातही लागू होतात. ज्या गोष्टी चुकीच्या आहेत, त्यांना पायबंद घालण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. जे चुकतील त्यांच्यावर कारवाई करणार आहोत. ते पंच असो, कुस्तीगिर असो वा पदाधिकारी असो. त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे.
अनेक वादविवाद होत आहेत, राजकारण केल्याचा आरोप होतो आहेत त्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, जो हरणारा पैलवान आहे, तो काही कारण सांगतो. त्यावरून वादविवाद होतात, कुस्ती खेळात रांगडे खेळाडू असतात, आणि आलेला निर्णय अंतिम असतो, पैलवान जर असे पंचाना मारहाण करत राहिले तर स्पर्धेसाठी पंच पुढे येणार नाहीत.आतापर्यंत महाराष्ट्र केसरी वादाविनाच झाली नाहीये, आरोप प्रत्यारोप होत आहेत. उद्या परत आम्ही सर्वजण एकत्रिय दिसून असंही संदीप भोंडवे यांनी स्पष्ट केलं आहे.