जालना/महान कार्य वृत्तसेवा
मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अखेर आज स्थगित करण्यात आले आहे. सरकारचे प्रतिनिधी म्हणून अंतरवाली सराटीत आलेल्या आमदार सुरेश धस यांच्याहस्ते ज्यूस पिऊन त्यांनी उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली. मात्र, याचवेळी सरकारने आमच्या मागण्यांसदर्भात लवकरच निर्णय न घेतल्यास पुढील आंदोलन राजधानी मुंबईत करणार असून त्याचीही घोषणा केली जाईल, असा इशाराच सरकारला दिला आहे. आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार प्रकाश सोळुंके यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे यांनी ज्यूस पिऊन उपोषण सोडले. यावेळी, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख हेही उपस्थित होते. विशेष म्हणजे मनोज जरांगे यांनी आपले उपोषण सोडण्यापूर्वी धनंजय देशमुख यांना आपल्या हाताने पाणी पाजले.
मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित करण्यापूर्वी उपस्थितांना व राज्यातील मराठा बांधवांना उद्देशून भाषण केले. काही लोक म्हणत आहेत की मनोज जरागेंच्या उपोषणातून काय मिळाल, पण त्यांचा 24 घंटे एकच धंदा आहे, त्यांना काही करायचे नाही. राज्य सरकारकडून शिंदे समिती पूर्णपणे बंद करण्यात आली होती. शिंदे समितीच्या मंत्रालयावरील ऑफिसला कुलूप लावण्यात आले होते, जे काय मिळालं म्हणत होते ना, घरात बसून नेत्यांचे पाय चांटणाऱ्यांना कळत नाही, असा टोला काही मराठा समन्वयकांना जरांगे पाटील यांनी लगावला. तसेच, आता शिंदे समिती राज्यात काम करणार आहे, पूर्ण राज्य आमचे आहे. पण, बीड आणि धाराशिव जिल्ह्यात काही अधिकारी जातीवादी आहेत, ते मराठा समाजातील तरुणांना प्रमाणपत्र देत नाहीत, त्यांना बडतर्फ केलेलच बर असे जरांगे पाटील यांनी म्हटले.
मंत्र्यांच्या पोरांना धरायचे अन् हाणायचे
गेल्या वर्षी मोडी लिपी अभ्यासकांना पैसे न दिल्यामुळे ते काम सोडून आपापल्या घरी गेले, आमच्याकडे काही अभ्यासक आहेत त्यांना अधिकार द्या. सग्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आम्हाला पाहिजेच आहे. ते नाही झाले, तर लवकरच मुंबईची तारीख जाहीर करतो. मग वापस येणार नाही, आपल्याला मुंबईला पोलिसांनी मारले तर पोलिसांना बोट लावायच नाही. पण, मंर्त्यांना आणि त्यांच्या पोरांना धरायचं आणि हाणायचं असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला. तसेच, आता हे आंदोलन स्थगित करत आहे, या जागेवर सभामंडप करायचा आहे. यापुढे शक्यतो आता उपोषण करायचे नाही, समोरासमोर लढायच आहे. लवकर अंमलबजावणी न झाल्यास मुंबईची तारीख जाहीर करेल, तेव्हा मुंबई जाम होऊ शकते, यावेळी मराठे मागे येऊ शकत नाहीत, असेही जरांगे यांनी म्हटले.