Spread the love

विठ्ठल बिरंजे/महान कार्य वृत्तसेवा
लहरी निसर्ग, अनियमित पाऊस आणि रोज एक नव्या रोगाचा प्रादुर्भाव यामुळे शेती दिवसेंदिवस घाट्यात चालली आहे. याला पर्याय म्हणून शिराळा येथील शेतकऱ्यांनी अनोखा प्रयोग राबविला आहे. आरोग्यासाठी लाभदायक असलेल्या गवती चहाचे उत्पादन घेत आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. कमी खर्चात, जास्त उत्पादन मिळाल्यामुळे आता या परिसरातील शेतकरी गवती चहाच्या शेतीकडे वळत आहेत. विशेष म्हणजे या गवती चहाचा ब्रँड तयार करुन मुंबईचे मार्केट काबिज केले आहे.
सुरुवातीला मार्केटचे तंत्र न समजल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले. परंतु हार न मानता मुंबई मार्केट शोधून काढले. विशेष म्हणजे या भागातील अनेक लोक नोकरीच्या निमित्ताने मुंबईमध्ये स्थायिक झाले आहेत. त्यांच्या माध्यमातून मार्केट बसविले.

शेती परवडत नाही म्हणून अनेकांनी शेतीचा नाद सोडला. पण अशा शेतकऱ्यांसमोर शिराळ्यातील शेतकऱ्यांनी एक वेळा आदर्श निर्माण केला आहे. गावातील 70 अल्पभूधारक शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन चक्क गवती चहाची शेती करुन भरघोस नफा मिळवत आहेत. त्यामुळे शिराळ्याला गवती चहाचा ब्रँड अशी नवी ओळख निर्माण होत आहे.


महिलांना घरबसल्या रोजगार
कापणी करुन गवत घरी आणल्यानंतर त्याची स्वच्छता करणे, पेंड्या बांधणे यासाठी महिलांना घरबसल्या रोजगार मिळत आहे. या व्यवसायात दररोज किमान 100 ते 150 महिला काम करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रपंचाला मोठा हातभार या शेतकऱ्यांनी मिळवून दिला आहे.

फायदेशीर शेती : अर्जुन पाटील (उपक्रमशील शेतकरी)
अन्य पिकांच्या तुलनेत या शेतीला नगण्य खर्च येतो, अंतर्गत मशागत फारशी करावी लागत नाही. ड्रीपद्वारे पाणी आणि सेंद्रीय खते देता येतात. त्यामुळे मजुर आणि खर्चाचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे ही शेती फायदेशीर ठरत आहे.