मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराडच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची ईडीने स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणी करणारी एक याचिका आरटीआय कार्यकर्ता अमेय तिरोडकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. बीड प्रकरणात कॅबिनेट मंर्त्याचे नाव सातत्याने समोर येत असल्याने पोलिस तपासाला मर्यादा येत असल्याचं या याचिकेत नमूद करण्यात आलं आहे.
बीड प्रकरणाचा सध्या एसआयटी आणि सीआयडीच्या माध्यमातून तपास सुरू आहे. त्याचसोबत निवृत्त न्यायाधीशांच्या माध्यमातून याची न्यायालयीन चौकशीही करण्यात येणार आहे. पण या प्रकरणामध्ये कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव सातत्याने समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये पोलिस तपासात मर्यादा येत असल्याचं या याचिकेत म्हटलं आहे. त्यामुळे ईडीने स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणीही या याचिकेतून करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाला प्रतिवादी करण्याची मागणी
धनंजय मुंडे यांच्या संबंधित अनेक कंपन्यांचे व्यवहार, मालमत्तांची यादी समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणाात निवडणूक आयोगाला प्रतिवादी करावं अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली असून त्यावर लवकरच सुनावणी अपेक्षित आहे.
मुंडेंच्या राजीनाम्यावरून दबाव वाढला?
मकोका लागलेल्या वाल्मिक कराड प्रकरणावरून अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाब वाढतच चालल्याचं चित्र आहे. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर कोर्टात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा अंजली दमानिया यांनी दिला. आजपर्यंत ज्यांची भेट घेतली, त्यांनी कार्यवाही का केली नाही? यासाठी त्यांनाही प्रतिवादी करावं लागेल असा इशारा दमानिया यांनी दिला आहे.
धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करत अंजली दमानिया यांनी सोमवारी अजित पवारांची भेट घेतली होती. दमानियांच्या मागणीवर बोलताना अजित पवारांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्याचं दिसतंय. जे दोषी नाहीत त्यांच्यावर कारवाईचा प्रश्नच नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. दुसरीकडे आपल्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारच उत्तर देतील, असं धनंजय मुंडेंनी सांगितलं. तर याबाबतचा निर्णय अजित पवारानांच घ्यायचा आहे, फडणवीसांचा त्यामध्ये संबंध नाही, असं सुरेश धस यांनी म्हटलं.