Spread the love

कुरुंदवाड/महान कार्य वृत्तसेवा
राज्य सरकारने एसटीच्या तिकीट दरात वाढ केल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव ठाकरे गट)तर्फे कुरुंदवाड एसटी डेपो येथे जोरदार आंदोलन करण्यात आले. सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दिलेल्या सवलती, ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत प्रवासासाठी दिले जाणारे अनुदान आणि महिलांना अर्ध्या तिकिटाचा लाभ यामुळे झालेल्या आर्थिक तुटीची भरपाई सरकार एसटीच्या भाडेवाढीतून करत असल्याचा आरोप जिल्हाप्रमुख वैभव उगळे यांनी केला. ही भाडेवाढ सर्वसामान्य प्रवाशांवर आर्थिक ओझे टाकणारी असून, ती त्वरित मागे घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता शिवसेना विभाग गटाच्या वतीने एसटी भाडेवाढीच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी आगार व्यवस्थापक नामदेव पतंगे यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाप्रमुख उगळे म्हणाले, “एसटी ही ग्रामीण आणि मध्यमवर्गीय जनतेसाठी जीवनवाहिनी आहे. शहरांमध्ये रेल्वे, मेट्रो, रिक्षा, टॅक्सी यासारखे पर्याय उपलब्ध असले, तरी ग्रामीण भागात एसटी हा प्रवासाचा एकमेव पर्याय आहे. मात्र, वारंवार होणाऱ्या भाडेवाढीमुळे सामान्य नागरिकांना फटका बसत आहे. ही भाडेवाढ रद्द करावी.”
यावेळी उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, तालुकाप्रमुख संजय अनुसे, उपतालुकाप्रमुख युवराज घोरपडे, शहरप्रमुख बाबासाहेब सावगावे, माजी तालुकाप्रमुख दयानंद मालवेकर, माजी नगरसेवक राजू आवळे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरकारच्या धोरणांचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.