Spread the love

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने विशेष मकोका न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात 26 जणांचा समावेश आहे. या आरोपपत्रात अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. याप्रकरणात अटक करण्यात आलेला लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य शिवकुमार गौतम याने बाबा सिद्दीकी यांची हत्या केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या कशाप्रकारे केली, त्याचा कट कसा रचला, याबद्दल शिवकुमार गौतमने पोलिसांना सांगितले. माझा मित्र हरीश कश्यप याने माझी ओळख प्रवीण लोणकर आणि शुभम लोणकर यांच्याशी करुन दिली. मी या दोघांना तीन वर्षांपासून ओळखत होतो. आम्ही एकमेकांना भेटायचो तेव्हा आमच्यात विविध विषयांवर चर्चा व्हायची. प्रवीण लोणकर याला त्याच्या जवळचे लोक ‘अण्णा’ बोलायचे आणि शुभम लोणकरला लाडाने ‘शुभ्भू’ नावाने हाक मारायचे. हरिश कश्यप याचा चुलतभाऊ धर्मराज कश्यप हादेखील सहा महिन्यांपूर्वी पुण्यात कामाला आला होता. तेव्हा मी, धर्मराज कश्यप दोघे हरिश कश्यपच्या दुकानात काम करायचो, असे शिवकुमार गौतमने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले आहे.
शिवकुमार गौतमनं सांगितलं की, त्यावेळी मी धर्मराज कश्यपची ओळख प्रवीण लोणकर आणि त्याचा भाऊ शुभम लोणकर यांच्याशी करून दिली. मी दारू पीत नाही, पण शुभम लोणकर नेहमी धर्मराजला दारू पाजायचा आणि आमच्या खाण्यापिण्याचा खर्च करायचा. जेव्हा मी आणि धर्मराज कश्यप शुभम लोणकर आणि प्रवीण लोणकर यांना त्यांच्या डेअरीमध्ये भेटायला जायचो, तेव्हा शुभम लोणकरनं माझी आणि धर्मराज कश्यपची ओळख त्याच्या पुण्यातील मित्र रूपेश मोहल, शिवम कोहाड, करण साळवे, आदित्य गुलनकर, गौरव यांच्याशी करून दिली, जे तिथे नियमितपणे येत होते. अपूनने ते रफिक शेखद्वारे पूर्ण करून दाखवले. त्या काळात एके दिवशी शुभम लोणकरनं स्वत: मला सांगितलं की, तो आणि त्याचा मोठा भाऊ प्रवीण लोणकर लॉरेन्स बिश्नोई टोळीसाठी काम करतात आणि त्याच्या दुकानात तो ज्या लोकांना भेटतो ते म्हणजे रूपेश मोहल, शिवम कोहाड, करण साळवे, आदित्य गुलनकर, गौरव अप्पुणे, शुभम लोणकर आणि प्रवीण लोणकर यांच्या सूचनेनुसार रफिक शेख आणि ते सर्व लॉरेन्स बिश्नोई टोळीसाठी काम करतात.