उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल
मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासह इतर मागण्यांसाठी अंतरवाली सराटीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. मनोज जरांगे पाटील हे सातव्यांदा आंदोलनाला बसले आहेत. तर या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. दरम्यान अंतरवाली सराटीत दोन उपोषणकर्त्यांची तब्येत खालवली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्याना आता पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे हलवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.
आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस
अंतरवाली सराटीतील दोन उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली असून त्यांना पुढील उपचारासाठी आंतरवाली सराटीतून उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे हलवण्यात आलं आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरूय. मनोज जरांगे यांच्यासोबत काही मराठा आंदोलक देखील आमरण उपोषणासाठी बसले आहेत. दरम्यान आजच्या तिसऱ्या दिवशी दोन आंदोलकांना अशक्तपणा आल्याने तब्येत खालावली आहे. यात एका महिला उपोषणकर्त्याचां देखील समावेश आहे. येरमाळा येथील मंदाकिनी बारकुल आणि बीड येथील भास्कर खांडे हे देखील उपोषणाला बसले होते. यावेळी त्यांची तब्येत अचानक खालावली आणि त्यामुळे या दोन्ही उपोषणकर्त्यांना उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आलेय.
जरांगे पाटलांच्या नेमक्या मागण्या काय?
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 25 जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. दरम्यान 26 जानेवारीला सगेसोयरेची अधिसूचना काढून एक वर्ष पूर्ण झाले आहे. एक वर्ष झालं, मात्र समाज रस्त्यावर आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी जीआर काढून त्याचे तात्काळ वाटप करण्यात यावे. ज्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली त्यांच्या सर्वच सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाण पत्र द्यावे. शिंदे समितीचे काम पुन्हा सुरू करून नोंदी सापडून देण्याचे काम करावे. आंदोलनातील दाखल गुन्हे मागे घ्यावेत. हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅझेट लागू करावे, या सह आठ-नऊ मागण्या मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे सादर केल्या असल्याचे सांगितलंय. तसेच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली, यासाठी सुद्धा आपण लढायचे आहे. यातील सर्वच आरोपींना फाशीची शिक्षा करण्याची मागणी आपण या आंदोलनात केली आहे. संतोष भैयाला न्याय मिळेपर्यंत आपण लढणार आहोत. सरकारने मराठ्यांच्या मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करा. मराठ्यांच्या मागणीशी मुख्यमंत्री गद्दारी करणार नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे.