प्रविण पवार/महान कार्य वृत्तसेवा
केंद्र शासनाच्या महत्त्वकांक्षी जीवन मिशन योजनेचा भार तांत्रिक मनुष्यबळा अभावी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सोसवेना झाला आहे. असे असतानाही इचलकरंजी शहरातील सहा जलकुंभाचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानेच करावे असा अट्टाहास केला जात आहे. असे झाल्यास सव्वापाच कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा महापालिका तिजोरीवर पडणार आहे.मुळातच मनपा हिस्स्याची रक्कम भरताना मनपाला कर्ज काढावे लागत आहे. असे असताना ज्यादा रकमेची तरतूद महापालिकेकडून होण्याची शक्यता नसल्याने इचलकरंजी शहरांमध्ये नव्याने उभारण्यात येणाऱ्या सहा जलकुंभ उभारणीचे काम रखडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
इचलकरंजी शहराला नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी 332 लाख लिटर पाणी साठवण क्षमता आवश्यक आहे.सध्या 15 जलकुंभाच्या माध्यमातून 259 लाख लिटर पाण्याची साठवण केली जाते. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करण्यामध्ये मर्यादा येत आहेत.ही साठवण क्षमतेतील तूट भरून काढण्यासाठी नवीन सहा जलकुंभ उभारणीसाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास मंत्रालयाने इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महा अभियानांतर्गत सहा नवीन जलकुंभ उभारणीच्या कामास फेब्रुवारी 2024 मध्ये मंजुरी दिली आहे. सदर कामासाठी 31.37 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सदर कामासाठी कार्यान्वित यंत्रणा म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु सदर कामाची जबाबदारी घेण्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची यंत्रणा सक्षम नाही. तांत्रिक मनुष्यबळाची कमतरता व जलजीवन मिशन कामाची असणारा जबाबदारी जीवन प्राधिकरणाकडे असल्याने सदरचे काम महापालिका यंत्रंणेकडून करून घेणे योग्य होईल असे शासनास कळवले आहे असे असतानाही सदरचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने करावा असा अट्टाहास सध्या सुरू आहे. सदरचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास दिल्यास महापालिकेच्या तिजोरीवर अतिरिक्त 5.18 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे यामध्ये प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार शुल्क म्हणून साडेसात टक्के रक्कम आकारली जाणार आहे. तर 10.69% जागा दराची निविदा मंजूर करण्याचा घाट घातल्यामुळे एकूण प्रकल्प रकमेच्या 18.19% वाढ होणार आहे या पूर्ण रकमेचा बोजा हा महापालिका तिजोरीवर पडणार आहे. सध्या महापालिका तिजोरी मध्ये खडखडाट असल्याच्या कारणाने जलकुंभ उभारणीच्या कामांमध्ये स्वनिधी 9.41 कोटी भरण्यासाठी महापालिका कर्ज काढत आहे. तर अतिरिक्त पडणारा बोजाची रक्कम कुठून उभी केली जाणार हा यक्ष प्रश्न जलकुंभ उभारणीच्या कामापुढे असल्याने जलकुंभ उभारणीच्या कामांमध्ये खोडा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जलकुंभ उभारणीसाठी
प्रकल्प खर्च – ३१.३७ कोटी
राज्यशासन अनुदान – २१.९६ कोटी
मनपा स्वहिस्सा – ९ .४१ कोटी
कार्यन्वीत यंत्रणा मजीप्रा असल्यास पडणारा अतिरिक्त बोजा
१)काम पुर्ण ठेव तत्वावर असल्यास प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार शुल्क ७.५० % प्रमाणे – २ . ३५ कोटी
२ ) १०.६९ % ज्यादा दराची निविदा – २.८३ कोटी
