प्रयागराज/महान कार्य वृत्तसेवा
महाकुंभमेळ्यातून एक मोठी बातमी आली आहे. बॉलिवूडमध्ये 90 चे दशक गाजवणारी अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने धार्मिक विधी करुन संन्यास घेतला. आता ती किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर श्री यमाई ममता नंदगिरी झाली आहे. किन्नर आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण यांनी ही माहिती दिली.
स्वत:चे पिंडदान केल्यानंतर ममता कुलकर्णीने संन्यास घेतला. ममताचा पट्टाभिषेक झाला. यानंतर ममताला धार्मिक विधी करुन महामंडलेश्वर केल्याचे जाहीर करण्यात आले. ममताला किन्नर आखड्याची सदस्य म्हणून नवे नाव देण्यात आले आहे. हेच नाव आता ममताची ओळख असेल. ती साध्वी प्रमाणे जीवन जगणार आहे.
अभिनय क्षेत्रात नशीब आजमावल्यानंतर ममता मागील 24 25 वर्षांपासून परदेशात वास्तव्यास होती. ममतावर अमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात सहभागी असल्याचा आरोप झाला. पण हा आरोप सिद्ध झाला नाही. आता प्रदीर्घ काळानंतर मायदेशी परतलेली ममता संन्यास घेऊन एका नव्या आयुष्याला सुरुवात करत आहे.
मागील वर्ष दीड वर्षापासून ममता कुलकर्णी किन्नर आखाडा आणि महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण यांच्या संपर्कात होती. प्रदीर्घ चर्चेअंती ममताने संन्यास घेण्याचा निर्णय घेतला.