संतोष पाटील/महान कार्य वृत्तसेवा
हातकणंगले नगरपंचायतींच्या हद्दीत विविध प्रयोजनांठी आरक्षण टाकलेल्या जमिनींची राजरोसपणे विक्री होवू लागल्याने त्याला चाप लावण्यासाठी संबंधित जमिनींवर ब्लॉक टाकण्यात यावा अशी मागणी पुढे आली आहे.
हातकणंगले नगरपंचायत हद्दीतील आरक्षण टाकलेल्या जमिनींवर दलालांनी डोळा ठेवून त्या जमिनी उद्योगपतींच्या घशात घालण्याचा सपाटा सुरू केला आहे. या व्यवहारात शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होत आहे. हे टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याची वेळ आली आहे.
शासनाने वेळीच दखल घेतली तर किंमती मोटारींवरून तहसिल कार्यालय आवारात दिवसभर घिरट्या घालणाऱ्या दलालांचा रूबाब उतरेल आणि शेतकऱ्यांची होणारी लुबाडणूक थांबेल असे लोक बोलत आहेत.
आता पहावे लागेल तहसिलदार सुशिलकुमार बेलेकर, मुख्याधिकारी दीपक पाटील काय भूमिका वटवतात, कठोर निर्णय घेतात की, व्हाईट कॉलर दलालांच्या रूबाबाला बळी पडतात?.
अशी होते फसवणूक
शासनाने विविध प्रयोजनांसाठी आरक्षण टाकलेल्या आणि प्रसिध्द केलेल्या यादीत गट नंबर आणि त्याचे एकत्रित क्षेत्र नमुद केलेले आहे. पण त्या गटातील किती क्षेत्र अधिग्रहण होणार आहे याची पुसटशीही कल्पना संबंधित शेतकऱ्यांना नाही. याचाच फायदा उठवत हे दलाल त्या शेतकऱ्यांना गाठून तुमच्या सर्व गट नंबरमधील जमिनींवर आरक्षण पडलेले आहे. हे भासवून व्यवहार करत आहेत. यास भोळाभाबडा शेतकरी बळी पडत असून कवडीमोल दराने जमिनी दलालांच्या घशात जात आहेत. आणि या जमिनी चढ्या भावाने हे दलाल परप्रांतिय उद्योगपतींच्या घशात घालत आहेत यात शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होत आहे. या दलालांची दलाली काही कोटींच्या घरात आहे. या प्रवृत्तीपासून शेतकऱ्यांनी वेळीच सावध व्हावे. या दलालांच्या भुलथापांना बळी पडू नये असेही लोक पेठा भागात बोलत आहेत.