मुंबई/ महान कार्य वृत्तसेवा
तेलंगणातील हैदराबादमधून अत्यंत निर्दयी घटना समोर आली आहे. रंगारेड्डी जिल्ह्यातील एका निवृत्त लष्करी जवानाने आपल्या पत्नीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि नंतर ते प्रेशर कुकरमध्ये शिजवून तलावात टाकल्याचे कबूल केले आहे. दरम्यान महिलेच्या आई-वडिलांनी त्यांच्या बेपत्ता मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केल्यानंतर हा गुन्हा उघडकीस आला आहे.
मृत महिला बेपत्ता असल्यामुळे तिला शोधत तिचे कुटुंबीय माहेरी पोहचले. त्यावेळी आरोपीने भांडण झाल्यामुळे पत्नी घरातून निघून गेली असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपी पती, पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यासाठी सासरच्या लोकांबरोबर पोलीस ठाण्यात गेला होता. पण या प्रकरणी पोलिसांना संशय आल्याने त्यांनी पतीची चौकशी केली. चौकशी दरम्यान आरोपी पतीला पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखवताच त्याने पत्नीची हत्या केली असल्याचे कबूल केले.
कुकरमध्ये शिजवले मृतदेहाचे तुकडे
या प्रकरणी पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता, त्याने सांगितले की, ”आम्हा दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. 15 जानेवारी रोजीही आमच्यात भांडण झाले आणि त्यानंतर रागाच्या भरात पत्नी माधवीची हत्या केली. दुसऱ्या दिवशी मृतदेहाचे तुकडे केले आणि ते कुकरमध्ये शिजवले. नंतर हाडे मुसळाने बारीक करून मृतदेहाचे तुकडे तलावात फेकले.”
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना हैदराबादच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील मिरपेट भागात घडली आहे. या हत्येतील आरोपी पती हा निवृत्त लष्करी जवान असून, त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. निवृत्ती घेतल्यानंतर आरोपी डीआरडीओमध्ये आउटसोर्स्ड सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला होता. त्याचे आणि मृत महिलेचे 13 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना दोन मुले आहे. दरम्यान आरोपीने 15 जानेवारी रोजी पत्नीशी झालेल्या भांडणानंतर तिची हत्या केली आणि 16 जानेवारीला मृतदेहाची विल्हेवाट लावली. त्यानंतर 18 जानेवारी रोजी ही क्रूर घटना उघडकीस आली होती.
दरम्यान बुधवारी रात्रीपर्यंत, मीरपेट येथील तलावात पीडितेच्या मृतदेहाचे कोणतेही अवशेष पोलिसांना सापडले नव्हते. त्यामुळे यासाठी पोलिसांनी क्लूज आणि श्वान पथक तैनात केले असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.