Spread the love

संजय राऊत यांची घणाघाती टिका

नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवा
मंत्री असताना पालकमंत्रीपदासाठी हावरटपणा का? या प्रश्नाचे एकमेव उत्तर म्हणजे आर्थिक व्यवहारांसाठी पालकमंत्रिपदावरून दंगल सुरू आहे. नाशिकच्या कुंभमेळ्याचे फार मोठे बजेट असल्याने कुणाला तरी पालकमंत्रिपद हवे आहे तर सधन रायगड जिल्ह्यात असलेल्या औद्योगिक कंपन्यांकडून खंडणी आणि तोडपाणी करायचे असल्याने कुणाला तरी पालकमंत्री व्हायचे आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केली.
दोन पालकमंर्त्यांच्या नियुक्तीला दिलेली स्थगिती, एकनाथ शिंदे यांची नाराजी, मुख्यमंर्त्यांचा दावोस दौरा, उदय सामंत यांच्या अनुषंगाने होणारी चर्चा आदी मुद्द्यांवर संजय राऊत यांनी नवी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला.
पालकमंत्रिपदासाठीची दंगल आर्थिक देवाणघेवाणीसाठीच
मंत्रिपद मिळूनही पालकमंत्रिपदासाठी हावरटपणा सुरू आहे. पालकमंत्रिपदासाठीची दंगल आर्थिक देवाणघेवाणीसाठीच असल्याचे ठाम मत राऊत यांनी मांडले. नाशिकच्या कुंभमेळ्याचे मोठे असल्याने तसेच रायगडमधल्या औद्योगिक वसाहतीमध्ये छळून खंडणी गोळी करायची असल्यानेच दोघांना पालकमंत्रिपद हवे असल्याची टीका गिरीश महाजन आणि भरत गोगावले नाव न घेता संजय राऊत यांनी केले.
आपल्याच निर्णयांना स्थगिती देणारा हतबल मुख्यमंत्री
आपल्याच निर्णयांना स्थगिती देऊन मी हतबल मुख्यमंत्री आहे, हे फडणवीस यांनी दाखवून दिले. मुख्यमंत्री आपल्याच निर्णयांना स्थगिती देतात, हे आश्चर्यजनक असल्याचेही राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतर फडणवीस यांनी स्थगिती दिल्याचे सांगितले गेले. याचाच अर्थ दिल्लीवरून मुख्यमंर्त्यांच्या निर्णयात हस्तक्षेप केलाय. अजित पवार- एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस या कळसूत्री बाहुल्या आहेत. यांच्या दोऱ्या दिल्लीच्या हातात आहेत. मुख्यमंत्री ठामपणे एखादा निर्णय घेत असतील तर पालकमंत्रिपदासाठी रस्त्यावर दंगल करणाऱ्याच्या पाठीशी दिल्ली उभी असल्याचे दिसते, असा घणाघात राऊत यांनी केला.
महाराष्ट्रातून कोण जास्त पैशाच्या थैल्या दिल्लीला देतंय, त्यावर दिल्लीत वजन ठरतं
तसेच महाराष्ट्रातून कोण जास्त पैशाच्या थैल्या दिल्लीला देतंय, त्यावर संबंधित नेत्याचं दिल्लीत वजन असते. एकनाथ शिंदे यांचे ज्या अर्थी ऐकले जातंय, त्याअर्थी आम्ही जे ऐकले ते खरंय, असा टोलाही राऊत यांनी लगावला.