संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ
मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
पालकमंत्रिपदाच्या नियुक्त्यांवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे कळते आहे. त्याच नाराजीतून मूळगावी दरेला जाऊन मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा करीत आपली नाराजी थेटपणे त्यांनी बोलून दाखविल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे यांच्या रुसण्या-फुगण्याच्या चर्चा सुरू असताना उदय सामंत यांच्याबरोबर 20 आमदार असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.
नाराजी दाखवून काही पदरात मिळेल का? यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. परंतु शिंदे यांची परिस्थिती आजच्या राजकारणात बिकट आहे. भाजपसाठी शिंदे यांची गरज संपली आहे. उद्धव ठाकरे यांना संपविण्यासाठी शिंदे पुढे आले. आता शिंदे यांना संपवून नवीन ‘उदय’ पुढे येईल, असे विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले. त्यांच्या विधानाला एकप्रकारे संजय राऊत यांना दुजोरा दिला.
एकनाथ शिंदे ज्यावेळी रुसले होते त्यावेळीच ‘उदय’ होणार होता!
राऊत म्हणाले, ठाण्याचे उपमुख्यमंत्री जरा काही झाले की रुसून गावी जातात, नाराज होतात. पहाटे-दिवसा-दुपारी कधीही ते गावाला जातात. दरेगाव हे एकनाथ शिंदे यांच्यासाठी दावोस आहे. ते सारखेच गावाकडे जाणार असतील तर मग सरकार कुणी चालवायचे? तुमच्या राग लोभ रुसव्या फुगव्यांनी सरकार चालणार आहे का? असा सवाल करीत एकनाथ शिंदे ज्यावेळी रुसले होते त्यावेळीच ‘उदय’ होणार होता, असे विधान संजय राऊत यांनी केले. त्यांनी एकप्रकारे वडेट्टीवार यांच्या विधानाला दुजोरा दिला.
काँग्रेस नेते वडेट्टीवार काय म्हणाले होते?
उद्याचा शिवसेनेचा नवा उदय होताना तुम्हाला दिसेल. कारण काही ‘उदय’ दोन्ही तबल्यावर हात मारून आहेत. संबंध चांगले करून ठेवले आहे ते उद्याच्या उदयासाठीचष्ठ उद्धवजींना संपविण्यासाठी शिंदे पुढे आले. आता शिंदे यांना संपवून नवीन ‘उदय’ पुढे येईल, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
एकनाथ शिंदे नाराज, मनधरणी करण्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते जाणार
पालकमंर्त्यांच्या नियुक्तीवरून एकनाथ शिंदे नाराज असल्याचे सांगितले जाते. साताऱ्यातील मूळगावी दरे येथे त्याच नाराजीतून ते गेल्याचेही समजते. त्यांची मनधरणी करण्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते जाणार असल्याचे कळते.