देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीची दमानियांनी क्राईम कुंडलीच सांगितली
मुंबई/ महान कार्य वृत्तसेवा
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत.त्यात आता देशमुख हत्या प्रकरणातील 8 ही आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. त्यामुळे देशमुख हत्या प्रकरणाच्या कारवाईला वेग आला आहे. अशात सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी या प्रकरणातील म्होरक्या सुदर्शन घुले यांची संपूर्ण क्राईम कुंडलीच समोर आणली आहे. तसेच आपण कलमं लिहून थकू, पण गुन्हेगार थकत नाहीत, असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्यासह नऊ जणांवर मकोका लावण्यात आला आहे. घुले हा बीडमधील गुंडांच्या टोळीचा म्होरक्या असल्याची माहिती सीआयडीने न्यायालयात दिली आहे. याच टोळीने संतोष देशमुख यांचा खून केल्याचा आरोप आहे. वाल्मिक कराड देखील याच टोळीचा सदस्य असल्याचं सांगण्यात आलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आधी सुदर्शन घुले व विष्णू चाटेसह एकूण आठ जण आरोपी होते. त्या सर्वांवर मकोका लावण्यात आला होता. परंतु, खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराड याचा देखील या हत्याकांड प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप करत देशमुख कुटुंबाने आंदोलन केलं. मस्साजोगचे ग्रामस्थ रस्त्यावर उतरले, तर संतोष देशमुखांच्या भावाने पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं होतं.
दरम्यान या प्रकरणात आता अंजली दमानिया वेळोवेळी ट्वीट करून महत्वाची माहिती समोर आणत आहेत. अशात आज अंजली दमानिया एक्स या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर सुदर्शन घुलेची संपूर्ण गुन्हेगारीची हिस्टरी बाहेर काढली आहे. यामध्ये सुदर्शन घुलेवर जिल्ह्यात 8 गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी त्याच्यावर एकूण 49 कलमे लावली होती. ही कलमे लावून सुद्धा सुदर्शन घुले मोकाट आहे.
या पोस्टमध्ये अंजली दमानिया लिहतात, कलमं लिहून थकू, पण गुन्हेगार थकत नाहीत. या हत्या प्रकरणातील नऊ आरोपींवर मकोका लावण्यात आला असून सीआयडीचे अधिकारी देखील बदलण्यात आले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले हा प्रमुख आरोपी आहे, असे देखील त्यांनी सांगितले आहे.