सांगली/महान कार्य वृत्तसेवा
शिरसगाव (ता. कडेगाव) येथे सौर ऊर्जा प्रकल्पासाठी 268 झाडांची विनापरवाना तोड केल्याप्रकरणी आवाडा ऊर्जा कंपनीला 2 लाख 68 हजाराचा दंड वन विभागाकडून ठोठावण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष शिरशेटवार यांनी दिली.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पासाठी शिरसगाव येथील जमीन देण्यात आली आहे. प्रकल्पासाठी अडथळा ठरणारी झाडे तोडण्यासाठी महावितरण व आवाडा एनर्जी या कंपनीसाठी 805 मिश्र प्रजातीच्या झाडांचे मूल्यांकन करण्यात आले. मूल्यांकन करण्यात आलेल्या झाडांपैकी 466 झाडे तोडण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, कंपनीकडून जादा झाडे तोडण्यात आल्याची तक्रारी संतोष मांडके यांनी वनविभागाकडे केली.
या तक्रारीची चौकशी केली असता परवानगी देण्यात आलेल्या झाडापेक्षा अधिक 268 झाडांची कत्तल करण्यात आल्याचे निदर्शनास आले. यामुळे वन विभागाकडून ऊर्जा कंपनीला प्रतिझाड एक हजार रुपये या प्रमाणे 2 लाख 68 हजारांचा दंड ठोठावण्यात आला असल्याचे शिरसेटवार यांनी सांगितले.