Spread the love

बोरगाव/महान कार्य न्यूज वृत्तसेवा
दुषित पाणीपुरवठा व वाढलेला डासांचा प्रादुर्भाव यामुळे बोरगाव येथे डेंग्यू व कावीळ साथीने थैमान घातले आहे. डेंग्यूची 4 तर कावीळ साथीचे सुमारे 10 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या साथीकडे आरोग्य खात्यासह नगरपंचायत अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.
जवळच्या इचलकरंजीसह येथील खाजगी रुग्णालयात कावीळचे रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. तर काहींनी रक्त तपासणीसाठी दिले असता त्यामध्येही काही रुग्ण कावीळचे आढळले आहेत. दूषित पाणीपुरवठा, अशुद्ध खाद्यपदार्थ, तळलेले खाद्यपदार्थ व आणि दूषित वातावरणामुळे ही कावीळ साथ आल्याचे खाजगी डॉक्टरांनी सांगितले आहे. काही प्रभागात मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव दिसून आला आहे .यामुळे चारहून अधिक जणांना डेंग्यू झाला आहे. कावीळ साथीने थैमान घातले असताना सुद्धा अधिकार्‍यांनी याकडे कानाडोळा केल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. डेंग्यूची लक्षणे पाहून नगरपंचायतीकडून काही भागात फॉगिंग करण्यात आले आहे. मात्र अजूनही डेंग्यूची रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकार्‍यांनी याकडे लक्ष देऊन वेळेत ही साथ रोखण्याची गरज असल्याचेही नागरिकांमधून बोलले जात आहे.