पंचगंगा नदीतील वाळू चोरीची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी
प्रवीण पवार/महान कार्य वृत्तसेवा
शेतजमीन सपाटी करण्यासाठी स्वतःच्या शेतातील उंच भागातील मुरूम उपसा करताना महसूल विभाग शेतकऱ्यांच्या वर कारवाईचा बडगा उगारत असते. त्या शेतकऱ्याच्या शेतीचा पंचनामा नोटीसा दंडात्मक कारवाई करणाऱ्या महसूल विभागाच्या साक्षीनेच दिवसाढवळ्या पंचगंगा नदीतील वाळू चोरी होत असताना महसूल विभागाने कारवाई का केली नाही. महसूल विभागाचा सर्वसामान्य शेतकऱ्यांवर कारवाई आणि वाळू माफीयांना अभय कशासाठी देण्यात येत आहे. असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिक उघडपणे विचारत आहेत.
पंचगंगा नदीतील गाळ उपश्याच्या नावाखाली काढलेली वाळू शहरातील काही भागांमध्ये डेपो मारून ठेवली आहे. तर बरीचशी वाळू ही माणकापूर तसेच अ.लाटमार्गे कृष्णा नदी काठा पलिकडे गेल्याची चर्चा उघडपणे सुरू आहे सदर वाळू डेपोचा शोध घेऊन शासनाचा महसूल विभाग व पाटबंधारे विभाग या वाळू माफियांवर कारवाईचे धाडस करणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पंचगंगा नदी मधील गाळ काढण्याच्या कामात शासनाने परवानगी दिली होती. त्यानुसार शेतकऱ्यांनी स्वखर्चाने गाळ काढून आपल्या शेतात वाहून नेण्यास परवानगी दिली होती. परंतु काही वाळूमाफियाने याचा गैरफायदा घेत मोठमोठ्या मशिनींच्या साह्याने कोट्यावधी रुपयाच्या वाळूची चोरी केली आहे. शेकडो डंपरच्या साह्याने पंचगंगा नदीतील वाळू उपसून इचलकरंजी शहरातील विविध भागांमध्ये त्याचे डेपो मारून ठेवले आहेत. तर मानकापूर परिसरामध्ये ही मोठ्या प्रमाणात वाळू साठवून ठेवल्याची चर्चा आहे. तर अनेक डंपर वाळू ही कर्नाटकात लंपास केल्याचे बोलले जात आहे. तसेच कृष्णा नदी काठावरील वाळू उपसा साठी प्रसिद्ध असणाऱ्या गावांमध्येही नदीपलीकडील अनेक वाळूचे डंपर जाताना नागरिकांनी पाहिले आहेत. कोल्हापूर नाक्यावरील नावाजलेल्या अपार्टमेंटच्या पाठीमागेही मोठ्या प्रमाणात वाळूचे ढीग दिसत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. चोरून नेलेल्या वाळूची किंमत ही कोट्यावधी रुपयाची आहे चार दिवसांमध्ये सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांच्या वाळूचा उपसा झाल्याच्या चर्चाही रंगू लागले आहेत. यातून शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडाला आहे शासनाच्या महसूल विभागाचे इचलकरंजी विभागाचे प्रांताधिकारी, तसेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी सदर वाळूमाफीयावर कारवाई करण्याचे धाडस करणार का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांतून विचारला जात आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः चौकशी करावी
पंचगंगा नदीपात्रातील गाळ काढण्याच्या नावाखाली झालेल्या वाळू चोरीच्या प्रकाराबाबत स्थानिक महसूल विभागाचे अधिकारी कारवाई करत नाहीत, त्यांची चौकशी करत नाहीत, याबाबत जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी व वाळू चोरी करणाऱ्या वाळू माफियावर तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यावर ही कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.