Spread the love

बीड/महान कार्य वृत्तसेवा
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर मकोका लागल्यानंतर बीड जिल्ह्यातील वातावरण तापले आहे. काल परळीत वाल्मिक कराडविरोधातील कारवाईनंतर पडसाद उमटले होते. आज दुसऱ्या दिवशीही परळीत तणावपूर्ण शांतता आहे. या अशांततेचे लोण आता केजमध्येही पसरले आहे. वाल्मिक कराड याला बुधवारी पुन्हा केज न्यायालयात हजर केले जाणार आहे. या पार्श्‌‍वभूमीवर केज न्यायालयाबाहेर प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या पोलिसांनी वकिलांनाही कोर्टात जाण्यास मनाई केली. त्यामुळे वकील प्रचंड संतापले.
पोलिसांनी गेटवर अडवल्यानंतर केज कोर्टातील वकील प्रचंड संतापले. कोर्टात जाताना तपासणी होत असल्याबद्दल वकिलांनी आक्षेप घेतला. आम्ही काहीही केले नाही. मग आमची तपासणी आणि आम्हाला का अडवले जाते. कोणत्याही वकिलाला थांबवायचे नाही. अन्यथा वातावरण वेगळं होईल, असा इशारा एका वकिलाने पोलिसांना दिला. पोलीस आणि वकिलांच्या या बाचाबाचीमुळे केज न्यायालयाच्या आवारात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अखेर वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि वकिलांच्या मध्यस्थीने हा वाद थांबला. मात्र, अद्याप ही पोलिसांकडून केज न्यायालयात येणाऱ्या लोकांची तपासणी आणि चौकशी सुरूच आहे.


वाल्मिक कराडला केज ऐवजी बीड न्यायालयात नेणार

वाल्मिक कराडला आज सुनावणीसाठी केज न्यायालयात आणण्यात येणार होते. मात्र, आता सुरक्षेच्या कारणास्तव वाल्मिक कराड याला बीड न्यायालयात नेण्यात येऊ शकते. सुरक्षेच्या कारणास्तव केज कोर्टाऐवजी बीडच्या कोर्टात सुनावणी घेण्याची सीआयडीची मागणी आहे. मात्र, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.