खा. धैर्यशील माने, आ. अशोकराव माने लक्ष घालणार?
विठ्ठल बिरंजे/महान कार्य वृत्तसेवा
हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीत नशिल्या पदार्थांची खुले आम विक्री सुरू आहे. पोलीसांच्या हप्तेखोरीमुळे हा उद्योग विस्तारला आहे.
हप्ता चुकला की कारवाईचे नाटक करायचं आणि त्यातून वसुली करायची. अशाच एका प्रकरणात चक्क मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीला गळ्यातील मंगळसूत्र विकण्याची वेळ आणावी, ही हप्तेखोरीची परिसीमाच म्हणावी लागेल. आता राज्य सरकारमधील ‘लाडकी बहिण’ योजनेचा उदो..उदो… करणारे खा. धैर्यशील माने, आ. अशोकराव माने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालतात का? हे पहावे लागेल.
रूईतील एका पानटपरीत नशेच्या गोळ्या विक्री होत असलेच्या संशयावरून रविवारी हातकणंगले पोलीस ठाण्यातील २ पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या पानटपरीवाल्याला ताब्यात घेवून दिवसभर पोलीस ठाण्यात डांबून ठेवले. नेमक्या या गोळ्या कशाच्या होत्या याची अद्याप कोणतीही खातरजमा झालेली नाही. परंतू, नशेच्याच गोळ्या आहेत. तुझ्यावर कारवाई होणार? अशी भीती दाखवून पानटपरीवाल्याला भंडावून सोडले. त्यानंतर नातेवाईक भयभीत झाले आणि त्यांची पोलिसांशी विनवणी सुरू झाली. दिवसभर हा प्रकार सुरू होता. परंतू, पोलिसांचा आवाका त्यांना न पेलणारा होता. अखेर काही रकमेवर तडजोड झाली आणि यासाठी पानटपरी चालकाच्या पत्नीला गळ्यातील मंगळसूत्र विकावे लागले. ते करूनही ठरलेली तडजोड पुर्ण न झाल्यामुळे शेवटी प्रापंचिक साहित्य भंगारात विकून तिने जमवाजमव केली आणि ‘त्या’ दोन पोलीसांचा खिसा भरला. त्यानंतर सायंकाळी पानटपरीवाल्याला सोडून देण्यात आले. विशेष म्हणजे हा प्रकार दिवसभर सुरू होता. परंतू, याची कानोकान खबर पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनाही लागू दिली नव्हती.
पोलीस ठाणे आणि आवारातील सीसीटीव्ही तपासावेत
या प्रकारातील पोलीसांची नावे समोर आलेली नाहीत असे सांगितले जाते. परंतू, बुधवारी दैनिक महान कार्यमधून वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आणि पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी त्या दोन पोलिसांची चांगलीच धुलाई केली. आता मेमाणे यांनी या प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्याची गरज असून रविवारच्या दिवसभरातील पोलीस ठाणे व आवारातील सीसीटीव्ही तपासून त्या दोन पोलिसांवर कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी पुढे आली आहे. तर अप्पर पोलीस अधिक्षक निकेश खाटमोडे काय भूमिका बजावतात? याकडेही लक्ष लागले आहे.
पोलिसांनी व्यक्त केली हळहळ
हातकणंगले, इचलकरंजी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या जुन्या जाणत्या अनुभवी पोलीसांनी हे वृत्त वाचल्यानंतर हळहळ व्यक्त केली. हा अघोरीच प्रकार म्हणावा लागेल. अशा अंतर्मनातील भावना त्यांनी दैनिक महान कार्य प्रतिनिधीजवळ बोलून दाखविल्या. त्यामुळे काही जण गैरप्रकार करतात आणि पोलिसांचे नाव बदनाम होते. यात सर्वच पोलीस भरडले जातात.