सावरकर मंत्री झाले असते तर शरद पवार असंच बोलले असते का? विनोद तावडेंचा पलटवार
मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनले. खरी शिवसेना आणि खऱ्या राष्ट्रवादीचाही मोठा विजय झाला. महाराष्ट्राच्या राजकारणात 1978 पासून शरद पवार यांनी दगा-फटक्याचे राजकारण सुरु केले. त्याला 20 फूट जमिनीत गाढण्याचे काम तुम्ही केल्याचे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवारांवर सडकून टीका केली. शिर्डी येथे आयोजित भाजपच्या महाअधिवेशनात बोलतान त्यांनी ही टीका केली होती. दरम्यान या टीकेले शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं. देशात अनेकांनी गृहमंत्री म्हणून चांगल काम केलं होतं. मात्र या लोकांना कधी तडीपार करण्यात आलं नव्हतं, असे म्हणत शरद पवारांनी अमित शाह यांचा तडीपारीचा मुद्दा उकरून काढलाय.
दरम्यान, या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी मध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी उडी घेत शरद पवारांवर टीका केली आहे. दोन जन्मठेपांची – काळ्या पाण्याची शिक्षा झालेले स्वातंर्त्यवीर सावरकर मंत्री झाले असते तर त्यांच्याबाबतही पवार साहेबांनी हेच वक्तव्य केले असते का? श्रद्धेय अटल जी, अडवाणी जी आणि अनेक मान्यवर नेते आणीबाणीच्या काळात 17 महिने तुरुंगात होते, ते नंतरच्या काळात मंत्री व पंतप्रधान झाले, त्यांच्याविषयी देखील हेच म्हटले असते का? हे पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेला नक्की सांगितले पाहिजे. असा सवाल करत विनोद तावडे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. एक्सवर ट्विट करत त्यांनी ही टीका केली आहे.
दाऊद हस्तकांना संरक्षण हे शिवरायांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही
पुढे बोलतांना विनोद तावडे म्हणाले आहे की, ‘दाऊदच्या हस्तकांना आपल्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करविणाऱ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा सोहराबुद्दीन सारखा लष्कर-ए-तोयबाचा हस्तक व इस्लामी दहशतवादी याच्या एन्काऊंटर मध्ये तडीपार होणे हे देशभक्तीचे लक्षण मानले जाईल. अमित शहांची तडीपारी दरोडा-चोरीसाठी नव्हती! दाऊद हस्तकांना संरक्षण हे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही, हे बहुदा मा. पवार साहेब विसरले आहेत’, असेही विनोद तावडे म्हणाले आहेत.
नेमकं काय म्हणाले होते शरद पवार?
शरद पवार म्हणाले की, देशाच्या स्वातंर्त्यानंतर अत्यंत प्रभावी काम करणारे सरदार पटेल यांचा उल्लेख करायला हवा. राज्यात यशवंतराव चव्हाण यांनी अतिशय मोलाचे काम केले आहे. शेजारील राज्य गुजरात तिथे देखील अनेक महत्वाचे लोक होते. या लोकांना कधी तडीपार करण्यात आलं नव्हतं. देशाच्या गृहमंत्र्यांर्ंनी काही विधान केलं. मला वाटतं त्यांनी थोडी माहिती घेऊन बोलायला हवं. 1958 सालापासून मी राजकारणात आहे. 1978 साली हे राजकारणात कुठ होते हे माहिती नाही. मात्र, त्यावेळी मी राज्याचा मुख्यमंत्री होतो.
मी मुख्यमंत्री असताना उत्तमराव पाटील माझ्यासोबत होते. त्यावेळी वसंतराव भागवत आणि प्रमोद महाजन यांचा उल्लेख करायला हवा. ते चांगलं काम करत होते. या नेत्यांचा इतर नेत्यांशी सुसंवाद होता. ही कर्तृत्ववान लोकं होती. त्यांनी कधी चुकीचं राजकारण केल नाही. भुजमधे भूकंप झाला त्यावेळी सरकार मधील लोकांची बैठक झाली त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांची एक समिती होती त्यांनी माझ्यावर भूकंप झालेल्या भाग पूर्व स्थितीवर आणण्याची जबाबदारी सोपवली होती, असे त्यांनी म्हटले.