मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
मागील आठवड्यात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत पक्ष संघटनेत बदल करावेत अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. यामध्ये जयंत पाटलांच्या प्रदेशाध्यक्षपदावर देखील नवीन आणि युवा चेहरा यावा, अशी मागणी होताना दिसतीये. तर आगामी काळात पक्ष संघटनेत बदल केले जातील, असे संकेत देखील शरद पवारांनी दिले आहेत. अशातच पक्ष संघटनेत बदलाचे वारे वाहू लागताच जयंत पाटील यांच्या मदतीला सुनील तटकरे धावून गेले आहेत.
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे सात खासदार फोडण्याचे प्रयत्न अजित पवार गटाकडून केला जात असल्याचा दावा केला जात होता. अजित पवारांसोबत येण्याची ऑफर सुनील तटकरेंनी दिल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली होती. त्यावर सुनील तटकरेंनी आरोप फेटाळून लावले. हे आरोप निराधार आहेत मी कोणालाही संपर्क केलेला नाही. आम्हा सर्वांची संसदेत भेट झाली. पण ती सगळ्यांचीच होते. पण मी कोणालाही राष्ट्रवादीत या असे सांगितले नाही, असे सुनील तटकरे म्हणाले.
सुनील तटकरेंना यावेळी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदावर विचारले गेले तेव्हा त्यांनी जिगरी मित्राची कड घेतली. त्यांच्या पक्षात कोणावर काय आरोप झाले, याबाबत मी बोलणार नाही पण असे असते की विजयाचे शिल्पकार अनेक लोक असतात पण पराभवाचे खापर कुणाच्या तरी माथ्यावर फोडले जाते, असे म्हणत सुनील तटकरे यांनी मित्राची बाजू राखण्याचा प्रयत्न केला आहे.
शरद पवार आणि अजित पवार यांच्यात एकत्र येण्याची चर्चा सुरु असती तर सुनील तटकरे यांना ते माहिती असते. परंतु, ते आमच्या खासदारांना सांगत आहेत की, बापाला आणि मुलीला राहू दे, बाजूला तुम्ही या, असे तटकरेंनी सांगितल्याचा आरोप आव्हाडांनी केला होता. त्यावर देखील तटकरेंनी उत्तर दिलेय. ही माझी भाषा नाही. मी बाप लेक असे शब्द सार्वजनिक जीवनात वापरत नाही. ज्यांनी हे सांगितले त्यांची तशी भाषा आहे. त्यामुळे माझ्याकडून असे काहीच बोलले गेलेले नाही, असे स्पष्टीकरण तटकरेंनी दिले आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी हे भिन्न विचाराचे लोक सत्तेसाठी एकत्र आलेले होते. लोकसभेत त्याना यश आले. त्यामुळे त्यांना विधानसभेला पण यशाची अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. त्यामुळे ते आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका वेगवेगळे लढतील, असेही सुनील तटकरेंनी यावेळी म्हटले आहे.
