Spread the love

मध्य प्रदेश/ महान कार्य वृत्तसेवा
मध्यप्रदेशातील एका घरात छापा टाकायला गेलेल्या आयकर विभागातील अधिकाऱ्यांना मगरी सापडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यात एका घरात आयकर विभागाने छापा टाकला याच दरम्यान तीन ते चार मगरी बाहेर पडल्या. या प्रकरणाची माहिती वन विभागाला देण्यात आली, त्यानंतर तातडीने मगरींना रेस्क्यू करण्यात आले. या प्रकरणी वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मगरींची आरोग्य तपासणी केली जात आहे. या प्रकरणाची संपूर्ण माहिती न्यायालयाला दिली जाईल आणि कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाईल. मध्य प्रदेश वन दलाचे प्रमुख असीम श्रीवास्तव यांनी एकूण किती मगरी सापडल्या आणि ते कोणाचे घर होतं हे स्पष्ट केलं नाही. घरातून एकूण चार मगरी सापडल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. या घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून या मगरी तिथे कशा आल्या याचा पोलीस तपास करत आहे.