कर्नाटक/महान कार्य वृत्तसेवा
सहा जहाल नक्षलींनी आत्मसमर्पण केल्यानंतर कर्नाटक नक्षलमुक्त झाल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे. चिक्कमगलुरू जिल्ह्यात सहा नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करताना शस्त्रे खाली ठेवली आहेत. आत्मसमर्पण केलेल्या सहा बंडखोरांपैकी चार मुंडागारू लथा, सुंदरी, जयन्ना आणि वनाजाक्षी हे कर्नाटकातील आहेत. इतर दोन वसंता टी उर्फ रमेश आणि एन जिशा हे अनुक्रमे तामिळनाडू आणि केरळचे आहेत. प्रमुख नक्षलींपैकी एक असलेल्या लता मुंडागारूने सिद्धरामय्या यांना निवेदनाच्या प्रतीसह गणवेश सुपूर्द केला. सिद्धरामय्या यांनी मुंडागारू आणि तिच्या पाच सहकाऱ्यांचे गुलाबपुष्प आणि संविधानाच्या प्रती देऊन स्वागत केले आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार प्रामाणिक प्रयत्न करेल, असे आश्वासन दिले.
सहा कुख्यात नक्षलींनी आत्मसमर्पण केल्याने कर्नाटक सरकारने राबवलेल्या मोहिमेला मोठं यश आलं आहे. त्यामुळे कर्नाटक नक्षलमुक्त झाल्याचे मुख्यमंर्त्यांनी म्हटले आहे. कर्नाटक सरकारने नक्षली चळवळीचा खात्मा करण्यासाठी नक्षल आत्मसमर्पण आणि पुनर्वसन समिती स्थापन केली होती. या समितीने सहा जहाल नक्षलींना आत्मसमर्पण करण्यास भाग पडताना मुख्य प्रवाहात येण्याची संधी दिली आहे. कर्नाटकातील नक्षली चळवळीचा खात्मा करण्यासाठी विविध पातळीवर धोरणांची अंमलबजावणी करण्यात आली होती. यामध्ये तत्कालिन एडीजीपी शरदचंद्र आणि कर्नाटक गुप्तचर विभागाचे हेमंत निंबाळकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
मोहीम फत्ते कशी झाली? हेमंत निंबाळकरांनी सांगितला थरारक अनुभव
नक्षलींना गुडघ्यावर आणण्यात खारीचा वाटा उचललेल्या हेमंत निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मोहिम अत्यंत किचकट असल्याने कोणताही धोका न पत्करता मोहीम यशस्वी करायची होती. सहा जहाल नक्षलींची आत्मसमर्पण प्रक्रिया चिक्कमंगळूरला करायची होती, पण मुख्यमंर्त्यांच्या उपस्थितीत बंगळूरला पूर्ण करण्याची योजना होती. याची माहिती कोणालाच नव्हती. आत्मसमर्पण केलेल्या सहा नक्षलींचा सरकारी ताफा पोहोचल्यानंतर वादाचे प्रसंग घडले. मात्र, नक्षली आत्मसर्पण समिती आणि पोलिसांना त्यांना बंगळूरला आणण्यात यश आले. यामध्ये गुप्तचर विभागाचे हेमंत निंबाळकर यांचा समन्वय महत्त्वपूर्ण ठरला.
कर्नाटकातील नक्षलवादी कारवाया गुप्तचर विभागाच्या रडारवर
दरम्यान, कर्नाटकमधील नक्षलवादी कारवाया प्रामुख्याने पश्चिम घाट जिल्ह्यांमधील उडुपी, दक्षिण कन्नड, चिक्कमगलुरु, कोडगु आणि हसन या जंगलांपुरत्या मर्यादित होत्या. तथापि, 2022-23 च्या सुरुवातीला नक्षलवादी कारवायांनी पुन्हा डोके वर काढले होते. मार्च 2024 पासून, मालनाड आणि किनारी कर्नाटक प्रदेशात माओवादी सक्रिय झाले होते. तेव्हापासून त्यांच्या हालचालींवर नक्षलविरोधी दल (एएनएफ) आणि हेमंत निंबाळकर यांच्या नेतृत्वातील कर्नाटकच्या गुप्तचर विभागाने बारकाईने लक्ष ठेवले होते. एएनएफने या भागात कारवाया सुरू करतानाच सरकारने अलिकडेच आत्मसमर्पण धोरण सुद्धआ लागू करताना नक्षलींना मुख्य प्रवाहात येण्याची संधी दिली होती. त्यामुळे माओवादी गटांमध्ये आत्मसमर्पणाबद्दल चर्चा लागू झाली होती.
कोण आहेत हेमंत निंबाळकर?
हेमंत निंबाळकर हे कोल्हापूरचे सुपुत्र असून ते 1998 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. कर्नाटकातील एक धडाडीचे पोलिस अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. बेळगाव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केले. बेळगाव जिल्ह्यातील गणेशोत्सवादरम्यान दर वर्षी होणारी हिंदू- मुस्लिम दंगल त्यांनी कायमची थांबवली. सीमाभागात धगधगत असलेला मराठी-कन्नड वाद मिटवण्यामध्येही त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. बेळगावमध्ये असताना त्यांनी महिला आणि युवतींच्या सुरक्षतेसाठी आणि त्यांच्यामध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘अक्का-माई कार्यक्रम’ राबवला. त्याची युनेस्कोने दखल घेत कौतुक केलं. हेमंत निंबाळकर यांनी कर्नाटक एटीएस प्रमुखपदी काम केले. माहिती आयुक्त म्हणून काम करताना त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. सध्या त्यांच्याकडे गुप्तचर खात्याच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकपदाचा कार्यभार आहे.