बीड/महान कार्य वृत्तसेवा
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एसआयटीनं मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. आज कोर्टातील सुनावणीदरम्यान याबाबतची माहिती एसआयटीकडून दिली जाऊ शकते.
खरं तर, संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्यानंतर सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत होती. आतापर्यंत पोलिसांनी एकूण आठ जणांना या प्रकरणात अटक केली आहे. पण त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली नव्हती. आता अखेर देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीनं मोठी कारवाई केली आहे. सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आल्याची माहिती एसआयटी पथकातील वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात विविध नावे समोर येत असल्याने ही संघटीत गुन्हेगारी असल्याचे पोलिसांकडून कोर्टात सांगितले जात होते. टोळीच्या माध्यमातून बीडमध्ये गुन्हे केले जातायत, असे कोर्टात सांगितले जात होते. आता मोक्का कलम लावण्यात आला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीने सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई केली असली तरी ही कारवाई वाल्मिक कराडवर होणार नाही. कारण अद्याप वाल्मिक कराड याचे नाव संतोष देशमुख हत्या प्रकरणात समोर आले नाही. पोलिसांनी वाल्मिकला दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात अटक केली आहे. देशमुख हत्या प्रकरणात त्याचे कनेक्शन बाहेर आल्यास वाल्मिकवर देखील ही कारवाई होऊ शकते. पण तूर्तास एसआयटीने वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई केली नसल्याची माहिती समोर आली आहे.