मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांनंतर आता सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकांसाठी रणनिती आखण्यास सुरुवात झाली आहे. असे असतानाच शिवसेनेने (युबीटी) मोठी घोषणा केली आहे. मुंबईपासून-नागपूरपर्यंतच्या महापालिका आम्ही स्वबळावर लढू, अशी घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना महापालिकेच्या निवडणुकांबद्दल मोठी घोषणा केली आहे. आता शिवसेना (युबीटी) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे महाविकास आघाडीत फुट पडली का? असा सवाल केला जात आहे. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, झेडपीमध्ये शिवसेना यूबीटी स्वबळावर लढणार असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरेंनी आम्हाला तसे सांगितले आहे, असेही राऊत म्हणाले आहेत.
‘नागपूरपासून मुंबई पर्यंत आम्ही स्वबळावर लढणार. एकदा आम्हाला पाहायच आहेच, जे काही होईल ते होईल, आमचे असे ठरतेय. मुंबई, ठाणे नागपूर मध्ये कार्यकर्त्यांना संधी केव्हा देणार.कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्षवाढीला फटका बसतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका सर्व पक्षानी स्वबळावर लढवाव्या आणि आपापल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी,’ असे संजय राऊतांनी म्हटले आहे.
‘महाविकास आघाडी जागा वाटाघाटीमध्ये खूप वेळ वाया गेला, असे वडेट्टीवार यांनी म्हटले होते. त्यावरही राऊतांनी भाष्य केलं आहे. ते काय बोलतात त्यांच्याकडे फारसे लक्ष द्यायची गरज नाही. हरयाणामध्ये आम्ही होतो का? तिथे काँग्रेस पक्षासमोर कोणीच नव्हते. मग काँग्रेस ते का हारली. जम्मू-काश्मीरला का पराभूत झाली. महाराष्ट्रात काही लोक कोट शिवून तयार होते मुख्यमंत्री होण्यासाठी, त्यात आम्ही नव्हतो.शिवसेना प्रादेशिक पक्ष आहे, काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे. अख्या देशभरात तुमचा पराभव का होत आहे. सर्वत्र संजय राऊत आहे का? विजय वडेट्टीवार ही वाटाघाटीच्या बैठकीत उपस्थित होते. आघाडीमध्ये जो आघाडीची भूमिका स्वीकारत नाही त्यांना आघाडीमध्ये राहण्याचा अधिकार नसतो,’ असे राऊतांनी म्हटले आहे.