प्रवीण पवार/महान कार्य वृत्तसेवा
पंचगंगा साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शुक्रवारी रात्रीपासून हालचाली सुरू झाल्या आहेत. आवाडे भाजप आणि कोरे गटाला प्रत्येक एक जागा देण्यात येणार असल्याची कारखाना कार्यस्थळावर चर्चा सुरू आहे मात्र याबाबतचे चित्र आज सायंकाळी स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तर गतवर्षीच्या अब्दुल लाट येथील जागेबाबत खांदेपालट होण्याची शक्यता आहे.
देशभक्त रत्नाप्पा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या १७ जागेच्या निवडणूकीसाठी ९२ जणांनी १०४ नामनिर्देशन पत्रे दाखल केली होती. त्या अर्जांची छाननी शुक्रवारी झाली. यामध्ये सर्व सभासदांचे लक्ष लागून राहिलेल्या रजनीताई मगदूम यांचे दोन्ही अर्ज अवैध ठरवण्यात आले. त्यामुळे विरोधक हवालदिल झाले आहेत. विरोधी गटाच्या बहुतांशी उमेदवारांचे अर्ज छाननी मध्ये बाद झाले असून सहा ते सात अर्ज वैध ठरले असले तरी वैध ठरलेल्या उमेदवारांपैकी कोण कोणाचा याबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतु सदरची निवडणूक गतवर्षीप्रमाणेच बिनविरोध करण्याच्या हालचालींना वेग आला असून यासाठी रात्रभर खलबते सुरू असल्याची चर्चा आहे. यामध्ये माजी आमदार प्रकाश आवाडे गट भाजपाचे आमदार सुरेश हाळवणकर, आमदार विनय कोरे यांना प्रत्येकी एक जागा देण्यात येणार असल्याची चर्चा रात्री उशीरा पर्यत कारखाना कार्यस्थळावर सुरू होती.
दरम्यान रजनीताई मगदूम यांनी निमशिरगाव येथे आपले उमेदवार व समर्थकांची बैठक सकाळी बोलवली आहे. कुंभार गटाची भूमिका स्पष्ट करण्यात येणार आहे. तर आज सायंकाळी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेणेची मुदत असून त्यानंतर चिन्ह वाटप होणार आहे. त्यामुळे सायंकाळी तीन नंतरच निवडणूक बिनविरोध की थेट लढत हे ठरणार आहे.
१ आमदार पात्र तर जि.प. सदस्य १ पात्र, १ अपात्र
हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून नुकतेच निवडून आलेले आमदार अशोकराव कोंडीबा माने यांचा ब वर्ग व्यक्ती सभासद गटातून भरलेला निवडणूक वैद्य ठरला आहे. तर विरोधी गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांचा अ वर्ग उत्पादक सभासद गटातील अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे तर विजया पाटील यांचा महिला उत्पादक गटातील अर्ज वैध ठरवण्यात आला आहे.
एकूण निवडून द्यावयाच्या जागा -१७
प्रवर्ग-निवडून द्यायच्या जागा-आलेले अर्ज
अ वर्ग उत्पादक संस्था गट – १२ २४
अ वर्ग सभासद महिला. – ०२ ०४
अनुसूचित जाती – ०१ ०१
ब वर्ग संस्था सभासद – ०२ ० ६