Spread the love

नाशिकमध्ये पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
गेले काही दिवस राज्यात विविध ठिकाणी थंडीचा कडाका असल्याचे बघायला मिळाले. अजूनही काही भागांत थंडीचा जोर कायम असल्याचे दिसून येत आहे. अशातच आता वातावरणात पुन्हा नवीन बदल होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितलेय.
10 जानेवारीला राज्यात तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण राहून हलक्या पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. त्याचबरोबर काही भागांत थंडीचा जोर कायम असणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरात 10 जानेवारीला सकाळी धुके आणि नंतर निरभ आकाश असण्याची शक्यता आहे. मुंबईतील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. मुंबईतील किमान तापमानात वाढ झाल्याने मुंबईकरांना उकाडा जाणवण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
10 जानेवारीला पुण्यामध्ये सकाळी धुके आणि नंतर निरभ आकाश असण्याची शक्यता आहे. पुण्यातील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतकं असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. पुढील काही दिवसांत पुण्यातील किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये 10 जानेवारीला सकाळी धुके आणि नंतर निरभ आकाश असण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 11 जानेवारीला छत्रपती संभाजीनगरमध्ये हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये 10 जानेवारीला सामान्यत: ढगाळ आकाश राहून हलक्या पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. नाशिकमधील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 11 जानेवारीला सुद्धा नाशिकमध्ये पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या नागपूरमध्ये 10 जानेवारीला अंशत: ढगाळ आकाश असणार आहे. नागपूरमधील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 10 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. विदर्भात अजूनही थंडीचा जोर कायम आहे.
राज्यात थंडीचा जोर कायम असताना आता तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. नाशिकमध्ये थंडी आणि पाऊस दोन्ही बघायला मिळणार आहे. विदर्भात सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर विविध आजारांचा प्रादुर्भाव होताना देखील दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.