जयंत पाटलांसमोरच कार्यकर्त्याची शरद पवारांकडे मागणी
मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवदीत प्रदेशाध्यक्ष बदलाची मागणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली आहे. निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पक्षाची पहिलीच बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे चिंतन करण्यात येत आहे. या बैठकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नवीन प्रदेशाध्यक्ष करण्याची मागणी केली आहे. शरद पवारांसह सर्व ज्येष्ठ नेत्यांसमोरच कार्यकर्त्यानं ही मागणी केली. जयंत पाटील सध्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत.
मराठा समाजाव्यतिरिक्त प्रदेशाध्यक्ष करा अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत शरद पवारांकडे केली आहे. वेळ देणारा प्रदेशाध्यक्ष असेही पदाधिकारी यावेळी म्हणाले. तसेच रोहित पवार आणि रोहित पाटील यांच्याकडे मोठी जबाबदारी द्यावी, अशी मागणी देखील बैठकीत झाली आहे. या कार्यकर्त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काय केली कार्यकर्त्याने मागणी?
आपण सर्वांचे राजीनामे घ्या आणि तरुणांना संधी द्या. प्रदेशाध्यक्षापासून सर्व बदला. शक्यतो सामान्यकार्यकर्त्यांना भेटणारा मराठा समाजाच्या व्यक्तीरिक्त तरुण कार्यकर्त्याला संधी द्या. राज्यात वेगळं वातावरण चालू आहे, आपल्याला पवार साहेबांच्या नेतृत्त्वाचा फायदा घ्यायचा असेल तर जो अध्यक्ष खऱ्या अर्थाने पक्षासाठी वेळ देऊ शकेल त्या कार्यकर्त्याला संधी द्या. याचा अर्थ जयंत पाटील वेळ देत नव्हते असे नाही. पण, नवीन तरुणांना संधी द्या अशी विनंती करतो.
जयंत पाटील आक्रमक
एकीकडे जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या बदलीबाबत चर्चा सुरू असताना जंयत पाटील हे बैठकीत चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. बैठकीत पहिल्या रांगेत बसलेले अनेकजण ‘तिकडे’ हारगुच्छ देऊन आले. कोणाला ”तिकडे’ जायचे असेल त्यांनी जरूर जावे. बैठकीत जयंत पाटलांचा पहिल्या रांगेत बसलेल्या शशीकांत शिंदे, राजे टोपे यांच्याकडे रोख होता. एकीकडे जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या बदलीबाबत चर्चा सुरू असताना जंयत पाटील यांनी चर्चेत असलेल्या नावांच्या नेत्यांची अप्रत्यक्षपणे कानउघाडणी केली.