कॅलिफोर्निया:
अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाच्या जंगलात आग लागली आहे. ही आग एवढी भडकली आहे की आता लॉस अँजेलिसच्या नागरी वस्ती आणि ह.ॉलिवूडची लोक राहतात त्या हिल्सपर्यंत ही आग पोहोचली आहे. यामुळे जवळपास 1 लाख लोकांना घरे सोडण्यास सांगण्यात आले आहे. या आगीमुळे मोठे नुकसान झाले असून 5 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
हॉलिवूड स्टार्स आणि महागड्या घरांसाठी प्रसिद्ध असलेल्या पॅसिफिक पॅलिसेड्समध्ये 7 जानेवारीला सकाळी 10.30 वाजता आग लागली. आगीने सांता मोनिकाच्या टेकड्यांना वेढले आणि हळूहळू अल्ताडेना येथील ईटन कॅनियनमध्ये आग पसरली.या आगीने आतापर्यंत 42 चौरस मैल म्हणजेच सुमारे 108 चौरस किलोमीटर क्षेत्र जळून खाक झाले आहे. यामुळे सॅन फ्रान्सिस्कोसारख्या मोठ्या शहराच्या आकारमानाचा परिसर जाळून खाक झाला. धुराचे ढग इतके दाट आहेत की त्याच्या ज्वाला आणि धूर 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या व्हेनिस बीचपर्यंत स्पष्टपणे दिसत आहेत.
लॉस एंजेलिस परिसरातील आगीमुळे, अधिकाऱ्यांनी लाखो लोकांना शक्य तितक्या लवकर त्यांची घरे रिकामी करण्यास सांगितले आहे. या आगीमुळे सुमारे 70,000 लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. मार्क हॅमिल, मँडी मूर, जेम्स वूड्स आणि इतर सेलिबिटींनाही त्यांची घरे सोडावी लागली. या आगीत घरच नाही तर अनेक ऐतिहासिक वास्तूही जळून खाक झाल्या आहेत.
पॅसिफिक पॅलिसेड्स, ईटन आणि हर्स्टमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत. हेलिकॉप्टरमधून पाणी फवारले जात आहे. परंतू, हे पुरेसे ठरत नाहीय. पॅलिसेड्समध्ये 15,000 एकर, ईटनमध्ये 10,000 एकर आणि हर्स्टमध्ये 500 एकरपेक्षा जास्त जमीन आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. लोकांनी आपली वाहने रस्त्यांवरच सोडून दिली आहेत. यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्या, अँबुलन्स, पोलिसांच्या गाड्यांना वाट करून देण्यासाठी बुलडोझरने या वाहनांना बाजुला केले जात आहे. अनेक घरांना वाचविण्यासाठी लोकांनी आजुबाजुची झुडुपे कापून टाकली आहेत. यामुळे आग घरांपासून काही अंतरावर संपत आहे. अनेक घरांना आगीने वेढले आहे. आगीमुळे परिस्थिती बिघडलेली पाहून मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इटलीचा दौरा रद्द केला आहे. अनेक घरे जळून खाक झाली आहेत. तिथे इमरजन्सी घोषित करण्यात आली आहे.