मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
टोरेस या ज्वेलरी कंपनीने मुंबईतील हजारो गुंतवणूकदारांना करोडो रुपयांचा गंडा घातला आहे. या कंपनीने सोने, चांदी आणि मोइसॅनाइट स्टोनवर जबरदस्त रिटर्न देणार असल्याचे स्वप्न दाखवत हजारो लोकांकडून कोट्यवधी रुपये गोळा केले. मात्र, कंपनीचे मालक रातोरात गायब झाले. त्यानंतर आता गुंतवणूकदार त्यांचे पैसे मिळवण्यासाठी कंपनीच्या बाहेर उभे असताना दिसून येत आहेत.
आता या कंपनीचे दोन मालक देश सोडून युक्रेनला पसार झाल्याची माहिती पुढे आली आहे. तर अन्य दोघांविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. जॉन कार्टन आणि विक्टोरिया कोवालेको अशी युक्रेनला पळून गेलेल्या दोघांची नावे आहेत. या गैरव्यवहार प्रकरणी आतापर्यंत शिवाजी पार्क पोलिसांनी 100 हून अधिक तक्रारदाराचे जबाब नोदविले आहे. तसेच तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणात कोट्यवधीची उलाढाल झाली असून हा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. टोरेस या कंपनीने आठवड्याला मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून लोकांना मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक सांगितले. त्यानुसार हजारो लोकांनी यात गुंतवणूक केली. त्यातून या कंपनीने कोट्यवधी रुपये गोळा केले. महत्त्वाचे म्हणजे सुरुवातीच्या काळात त्यांनी गुंतवणूकदारांना परतावाही दिला, पण गेल्या दोन आठवड्यांत परिस्थिती बदलली आणि गुंतवणूकदारांना रिटर्न मिळणे बंद झाले. त्यानंतर सोमवारी अचानक कंपनीच्या सर्व शाखा बंद झाल्याचे दिसून आले. दरम्यान, सोमवारी कंपनीच्या शाखांना टाळे लागल्याचे बघून गुंतवणूकदारांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.