Spread the love

बीड/महान कार्य वृत्तसेवा
गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बीड शहरातील पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने मुख्यालयाच्या भिंतीलगत आवळ्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. अनंत मारोती इंगळे (रा. कळंमआंबा ता.केज जि बीड) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. दरम्यान पोलीस कर्मचारी अनंत इंगळे यांनी आत्महत्या का केली ? हे अद्याप अस्पष्ट असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे बीड जिल्हा सध्या चर्चेत आहे. या हत्याप्रकरणाच्या तपासासाठी सध्या सीआयडी आणि विशेष तपास पथकाचे (एसआयटी) अधिकारी सध्या बीड शहरात तळ ठोकून आहेत. बीड शहर पोलीस ठाणे हे सध्या संतोष देशमुख हत्याप्रकरणाचे केंद्रस्थान आहे. याच पोलीस ठाण्यात आरोपी वाल्मिक कराड यांना ठेवण्यात आले आहे. या सगळ्या पार्श्‌‍वभूमीवर पोलीस कर्मचारी अनंत इंगळे यांनी आत्महत्या केल्याने चर्चांना उधाण आले आहे. याप्रकरणात आता पोलीस पुढे काय तपास करणार, हे पाहावे लागेल. अनंत इंगळे यांच्यावर नेमका कोणता दबाव होता की त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यामुळे आता पोलीस तपासातून काय समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
पोलिसांचे वाल्मिक कराडशी लागेबांधे असल्याचा आरोप
बीड जिल्ह्यातील अनेक पोलिसांचे वाल्मिक कराड याच्याशी लागेबांधे असल्याची माहिती समोर आली होती. वाल्मिक कराड आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या पोलीस कर्मचाऱ्यांचा संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासासाठी गठित करण्यात आलेल्या एसआयटीत समावेश होता. आरोप झाल्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्यांना एसआयटीतून काढण्यात आले होते.
बीडमध्ये घडामोडींना वेग, सीआयडीकडून वायबसे दाम्पत्याची चौकशी
संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोप सुदर्शन घुले आणि सांगळे यांना शोधून काढण्यात ज्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली होती, त्या वायबसे दाम्पत्याची सीआयडीकडून पुन्हा चौकशी केली जाणार आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणी पुन्हा संभाजी वायबसे व सुरेखा वायबसे या दोघांची सीआयडीकडून चौकशी होणार आहे. यापूर्वीच संभाजी वायबसे आणि सुरेखाबाई वायभसे यांची सीआयडीने चौकशी केली होती, मात्र त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले होते. या हत्या प्रकरणातील एकमेव फरार आरोपी कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे. त्याच्या तपासासंदर्भात वायबसे दाम्पत्याची चौकशी होऊ शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे.