Spread the love

बीड/महान कार्य वृत्तसेवा
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. या प्रकरणाचा मास्टरमाइंड मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी निषेध मोर्चे काढले जात आहेत. परभणी येथील मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना इशारा दिला होता. तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून माझा मानसिक छळ सुरु असल्याचे म्हटले होते. यानंतर मुंडे समर्थक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. आता मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्या विरोघात किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे झालेली हत्या निषेधार्ह आहे. या घटनेतील दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे. मात्र या घटनेचा आधार घेत मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया हे सातत्याने वंजारी समाजावर टीका करत आहेत. समाजाचे नेते धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर आरोप करत आहेत. एवढेच नाही तर समाजातील अधिकारी कर्मचारी यांना लक्ष केलं जात आहे. वंजारी समाजाबद्दल जातीय तेढ निर्माण होईल, असं वक्तव्य केलं जात आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशा स्वरूपाची तक्रार किशोर गंगारामजी मुंडे यांनी लातूर जिल्ह्यातील किनगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्या विरोधात किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 352 3512, 3513, आणि 3(5) नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना इशारा
परभणीतील सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंना इशारा दिला होता. त्यांनी म्हटलं होतं की, धनंजय देशमुखांना तुम्ही धमक्या देताय? त्याचा भाऊ गेला आणि तो न्यायासाठी लढतोय, वणवण फिरतोय. त्याला तुम्ही धमक्या देताय. संतोष भैयाचे भाऊ जेव्हा पोलीस ठाण्यात गेले तेव्हा त्यांना धमकावण्यात आले. यापुढे जर त्यांचे कुटुंब आणि कुणाला धक्का लागला तर धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. देशमुख कुटुंबाला त्रास झाला तर लक्षात ठेवा, असे त्यांनी म्हटले होते.
काय म्हणाल्या होत्या अंजली दमानिया?
अंजली दमानिया यांनी म्हटलं होतं की, बीडमध्ये सर्व उच्चपदांवर वंजारी समाजाचे लोक आहेत. गोपीनाथ मुंडेंच्या काळापासून हे होत आहे, असा आरोप त्यांनी केला होता. अंजली दमानिया यांच्या विरोधात मुंडे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. यानंतर अंजली दमानिया यांनी यावर स्पष्टीकरण दिले होते. ”मी कोणत्याही प्रकारे जाती-समाजाविरोधात बोलले नाही. ट्विटरवर स्पष्ट करण्यासाठी मी दोन मुद्दे टाकले होते. भगवान बाबा नेहमीच वंदनीय आणि आदरणीय आहेत. वंजारी समाजाला हा प्रकार चुकीच्या पद्धतीनं सांगण्याचे काम केले गेले. सानप, मुंडे उच्च पदावरील माणसं परळीतच का? यासंदर्भात मी बोलले आणि ते लिहिलं देखील होतं आणि दाखवलं होतं. वंजारी समाजाचा वापर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याकडून होतोय यात शंका नाही. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून माझा प्रचंड मानसिक छळ होत असल्याचे त्यांनी म्हटले होते.