राजर्षी शाहू विकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार : अमरसिंह माने- पाटील
शिरोळ/महान कार्य वृत्तसेवा
येणाऱ्या काळात होणाऱ्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू विकास आघाडीच्या वतीने लढवल्या जाणार असल्याची माहिती राजर्षी शाहू विकास आघाडीचे शिरोळचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह माने – पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
राजर्षी शाहू विकास आघाडी हा नोंदणीकृत पक्ष असून यापूर्वी देखील या पक्षाच्या माध्यमातून जयसिंगपूर, शिरोळ व इचलकरंजी नगरपरिषदांच्या निवडणुका लढवल्या गेल्या होत्या. यामध्ये पक्षाच्या माध्यमातून उभारलेल्या उमेदवारांना या तिन्ही नगरपालिकांमधून जनतेने मोठ्या मताधिक्याने निवडून दिले होते. त्यानंतर 2024 ची विधानसभा राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून महायुतीच्या पाठबळावर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी लढवली आणि मोठ्या मताधिक्याने ते विजयी झाले. पक्षवाढीसाठी व पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद व बळ देण्यासाठी येणाऱ्या काळात होणाऱ्या कोल्हापूर महापालिकेसह शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीसह दोन्ही तालुक्यामधील जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड, इचलकरंजी, हुपरी व वडगांव या सर्व नगरपरिषदा व हातकणंगले नगरपंचायतीची निवडणुक लढवणार असल्याचे अमरसिंह माने पाटील यांनी पत्रकात शेवटी म्हंटले आहे.